ST Bus Accident : एसटी चालकाच्या एका निर्णयाने वाचले ४० जीव! बेल्ह्याजवळ मोठा अनर्थ टळला
ST Bus Accident : आळेफाटा ते आणे दरम्यान महामार्गाचे काम प्रवाशांच्या मुळावर; सुरक्षा फलक आणि सूचना बोर्डांचा अभाव असल्याचा स्थानिकांचा आरोप.

ST Bus Accident – अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर सुरू असलेल्या संथ आणि निकृष्ट कामामुळे बुधवारी (दि. ८) दुपारी मोठा अपघात होता होता टळला. गेवराई-नालासोपारा ही एसटी बस साइड पट्ट्या न भरल्यामुळे बेल्हे-गुळुंचवाडीच्या शिवेवर रस्त्याखाली घसरली. यावेळी बसमध्ये ४० ते ४५ प्रवासी होते. मात्र, एसटी चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच नियंत्रण मिळवल्याने सर्व प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला.
या घटनेमुळे महामार्गाच्या कामातील त्रुटी आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षभरापासून आळेफाटा ते आणे दरम्यान महामार्गाच्या कॉक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, ठेकेदाराने रस्त्याच्या साइड पट्ट्या न भरल्यामुळे हा अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. कामाच्या ठिकाणी कोणतेही सुरक्षा फलक, वळणाची सूचना देणारे बोर्ड किंवा सुरक्षा रक्षक नेमलेले नाहीत.
काही ठिकाणी रस्ता अर्धवट असल्याने एकेरी वाहतूक सुरू असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात. विशेषतः रात्रीच्या वेळी हा धोका अधिकच होतो. या महामार्गावरील कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत स्थानिक नागरिक वारंवार आवाज उठवत आहेत, परंतु संबंधित कॉन्ट्रॅक्टर याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.
सर्विस रोड आणि जोड रस्त्यांची कामेही प्रलंबित असल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन हे काम लवकरात लवकर आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. प्रवाशांच्या जीविताशी खेळणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाईची मागणी आता जोर धरत आहे.





