Pune Nashik Railway: पुणे-नाशिक रेल्वे मूळ सरळ मार्गानेच व्हावी! आंदोलनाला आढळराव-पाटील यांचा जाहीर पाठिंबा
Pune Nashik Railway: पुणे-नाशिक रेल्वे मार्ग बदलावा या निर्णयाला विरोध; खेड, आंबेगाव व जुन्नर परिसराच्या विकासासाठी ९ ऑगस्टच्या आंदोलनाला आढळराव पाटलांचा पाठिंबा.

Pune Nashik Railway – पुणे-नाशिक रेल्वे मूळ नियोजित सरळ मार्गानेच व्हावी, ही खेड, आंबेगाव व जुन्नर परिसराच्या विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त करत शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ७ ते १४ ऑगस्टदरम्यान बाहेरगावी असल्याने आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आढळराव पाटील म्हणाले, खासदार असताना त्यांनीच पुणे-नाशिक रेल्वेची संकल्पना मांडली होती. जवळपास १२ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर २०१६ मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २, ४२५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पास मंजुरी दिली. त्यावेळी रेल्वेमार्ग चाकण–खेड–मंचर–नारायणगाव–आळेफाटा–संगमनेर–सिन्नर असा निश्चित करण्यात आला होता.
पुढे हा प्रकल्प देशातील पहिला अर्ध-वेगवान रेल्वे प्रकल्प म्हणून विकसित करण्याचा निर्णय झाला आणि रेल्वे मंडळाच्या ‘पिंक बुक’मध्ये त्याचा समावेश करण्यात आला. मात्र नंतर मूळ मार्गाला बगल देत रेल्वेमार्ग बदलण्यात आल्याने या भागाच्या भविष्यातील विकासाला मोठा फटका बसणार असल्याचा दावा त्यांनी केला.
जीएमआरटी संशोधनाला कोणताही अडथळा न आणता रेल्वेमार्ग सरळ नेता येऊ शकतो, हे तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करता येईल, असेही त्यांनी सांगितले. अंतिम निर्णय होईपर्यंत राज्य व केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
“जीएमआरटीच्या संशोधन कार्यास बाधा न आणता पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मूळ सरळ मार्गाने नेता येईल का, याचा अभ्यास करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. ही समिती यापूर्वीच गठित होणे अपेक्षित होते.”
– शिवाजीराव आढळराव-पाटील, माजी खासदार.





