Pune Nashik Highway Delay | 7,827 कोटींचा महामार्ग.. पण काम सुरूच नाही ; नागरिकांचे केंद्रीय मंत्री गडकरींना निवेदन

प्रभात वृत्तसेवा
राजगुरुनगर – दि. 2 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने नाशिक फाटा-राजगुरुनगर उन्नत 8-लेन महामार्गासाठी तब्बल 7,827 कोटी रुपये निधीला मंजुरी दिली. तर तळेगाव-चाकण-शिक्रापूर (रस्ता क्र. 548 डी) या मार्गासाठी 4,206 कोटी रुपयांचा खर्च राज्य मंत्रिमंडळाने मान्य केला. तरीदेखील कामाचा प्रत्यक्ष कार्यारंभ झालेला नाही. भूसंपादन पूर्ण झाल्याशिवाय काम सुरू होणार नसल्याची चर्चा असून, यामुळे नागरिकांचा संयम सुटू लागला आहे.
पुणे-नाशिक महामार्ग व शिक्रापूर-चाकण मार्गावर वाढती वाहतूककोंडी, खड्डेमय रस्ते आणि अपघाताचे वाढते प्रमाण यामुळे नागरिक त्रस्त झाले असून तातडीने काम सुरू करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व लेखक अशोक टाव्हरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिल्ली येथे निवेदनाद्वारे केली. गडकरी यांनी निवेदनाची दखल घेत आपल्या खासगी सचिव दिपक शिंदे यांना कार्यवाहीबाबत निर्देश दिले. यावेळी भाजप खेड तालुका उपाध्यक्ष दिलीप माशेरे उपस्थित होते.
चाकण व शिक्रापूरसह औद्योगिक परिसरात जड वाहनांची प्रचंड संख्या असल्याने वाहतूककोंडी नेहमीचीच झाली आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण आणखीन वाढले आहे. पुणे-नाशिक महामार्ग क्र. 60 वरील नाशिक फाटा ते राजगुरुनगर या 30 किमी अंतरासाठी दोन ते अडीच तास लागत आहेत.
नागरिकांची मागणी..
वाहनांची वाढती संख्या, औद्योगिकीकरणामुळे वाढलेला ताण, पोलिसांच्या बंदी असूनही जड वाहनांची दिवसभर वाहतूक, दुरावस्थेतील रस्ते यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. रस्ते तातडीने दुरुस्त करून उन्नत महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करावी, हीच स्थानिकांची मागणी आहे.





