Pune : नाना पेठेतील लाकडी वाड्याला भीषण आग, अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण, जीवितहानी टळली

पुणे: शहरातील मध्यवर्ती भागातील नाना पेठेत राम मंदिराच्या बाजूला असलेल्या एका जुन्या लाकडी वाड्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले, परंतु अग्निशमन दलाच्या तत्काळ प्रयत्नांमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्राला रात्री आठच्या सुमारास नाना पेठेत राम मंदिराशेजारी असलेल्या मोठ्या लाकडी वाड्याला आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत आगीने मोठे स्वरूप घेतले होते. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने तातडीने आणखी मदत मागवली.
दहा फायर टेंडर आणि चार पाण्याच्या टँकरच्या साहाय्याने अग्निशमन जवानांनी वाड्याला चोहोबाजूंनी पाण्याचा मारा करत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आज रामनवमी असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे दुपारपासूनच या भागात मोठी गर्दी होती. त्यातच आगीची घटना घडल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. मध्यवर्ती भागातील अरुंद रस्ते आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असलेली गर्दी यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी आणि आग विझवण्यासाठी अडचणी आल्या. मात्र, जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवले.
आगीच्या घटनेमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.




