“माझाच आरोग्य प्रमुख हवा’, राज्यातील दोन मंत्र्यांमध्ये शितयुध्द

पुणे – महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदाला सोन्याचा भाव आला असून या पदावर आपल्याच मर्जीतील अधिकारी असावा यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील दोन मंत्र्यांमध्ये शितयुध्द सुरू आहे. त्यामुळे या युध्दात विद्यमान आरोग्य प्रमुखांची कोणत्याही क्षणी बदली होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, हा वाद शहरात तसेच प्रशासकीय वर्तूळात चांगलाच चर्चेचा ठरला आहे.
महापालिकेतील आरोग्य प्रमुखपद हे संविधानिक पद आहे. महापालिकेत महापालिका आयुक्तांच्या पदानंतर पालिकेतील हे सर्वात मोठे पद आहे. हे पद महापालिकेच्या सेवा नियमावलीनुसार, सेवा ज्येष्ठतेने उप आरोग्यप्रमुख पदावर असलेल्या अधिकाऱ्याला दिले जाते. मात्र, 2017 नंतर महापालिकेतील अधिकाऱ्यांना हे पद न देता थेट त्यावर राज्यशासनाकडून अधिकारी नियुक्त करण्यात येत आहे. करोना संकटाच्याआधी या पदावर शासनाने डॉ. रामचंद्र हंकारे यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर, आता डॉ. आशिष भारती यांच्याकडे या पदाचा पदभार आहे. तर भारती यांना शासनाने दिलेली मुदत संपलेली असून शासनाने अद्याप डॉ. भारती यांची बदली केलेली नाही.
त्यामुळे, डॉ. भारती यांच्या पदावर नियुक्त करण्यासाठी राज्यातील एका बड्या मंत्र्याने सोलापूर जिल्हा आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्यांसाठी लॉबिंग लावली होती तर आणखी एका मंत्र्याने डॉ. भारती यांना बदलण्याची गरज नाही अशी थेट भूमिका घेतली. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागप्रमुख पदावरून हे दोन मंत्री आमने सामने आले आहेत.
विशेष म्हणजे एक मंत्री राज्यातील बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट) असून दुसरे मंत्री भारतीय जनता पक्षातील आहेत. त्यामुळे राज्यात हे दोन्ही मंत्री एकत्र सत्तेत असले तरी पुण्यात मात्र त्यांना “आरोग्य प्रमुख’ आपल्याच मर्जीतील हवे असल्याने हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे.





