Pune : लोहगाव विमानतळ, हडपसर टर्मिनलसाठी पालिका सरसावली

पुणे – प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाचे ठरणारे लोहगाव विमानतळ आणि हडपसर येथील रेल्वेच्या नवीन टर्मिनलकडे प्रवाशांना सहज आणि कोंडीमुक्त रस्त्याने जाणे शक्य व्हावे यासाठी विमानतळाला जोडणारे सात रस्ते आणि हडपसर रेल्वे स्टेशनचे तीन रस्त्यांचे रूंदीकरण करण्यात येणार आहे.
महापालिकेकडून त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामासाठी सुमारे ४०४ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. यासाठीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यासाठी कात्रज -कोंढवा रस्त्याला शासनाने दिलेल्या निधीच्या धर्तीवर या रकमेची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेस या कामासाठी किमार २०० कोटींचा निधी मिळावा, अशी अपेक्षा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत सुरुवातीच्या काळात कमी अंतर असणारे, पण नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असे रस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ३३ रस्त्यांचा समावेश असून सध्या १४ रस्त्यांची जोडणी झाली आहे.
तर, उर्वरीत रस्त्यांमध्ये या दहा रस्त्यांचा समावेश आहे. लोहगाव विमानतळ आणि हडपसर रेल्वे स्टेशनच्या परिसरातील रस्त्यांचा समावेश नव्हता. राज्य सरकारच्या नागरी पुनरोत्थान महाअभियानअंतर्गत राज्य सरकारडून भूसंपादनासाठी निधी प्राप्त होतो. यामध्ये विमानतळ आणि रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळू शकतो ही बाब लक्षात घेऊन हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
विमानतळाकडे जाणारे रस्ते….
- एरेमॉलच्या मागे विकफिल्ड चौक
- गंगा बिझनेस पार्क विमाननगर ते शास्त्रीनगर
- ओकवुड अपार्टमेंट ते विकफिल्ड आयटी पार्क
- विकफिल्ड मागे एडब्ल्यूएलएस बिल्डिंग
- ५०९ चौक ते टिंगरेनगर
- डिलिव्हरी एक्सप्रेसचा रस्ता
- महादेव नगर चौक ते निशिगंधा अपार्टमेंट
हडपसर रेल्वे स्टेशनला जोडणारे रस्ते
- हडपसर स्टेशन ते ताडीगुत्ता चौक
- हडपसर स्टेशन ते राजर्षी शाहू महाराज चौक
- हडपसर स्टेशन ते मुंढवा रेल्वे पूल





