pune : फूटपाथसाठी पालिका ८८ कोटी खर्च करणार
Pune:

गेल्या वर्षीच्या १५ कोटींच्या फुटपाथ दुरुस्तीचे हिशेब कुठे? खड्ड्यांने पुणेकर हैराण झाले असताना पालिकेचा नेमका प्राधान्यक्र काय?
pune : शहरातील रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली असताना महापालिकेने तब्बल ८८ कोटी खर्चून जागतिक दर्जाचे फुटपाथ बनविण्याचा घाट घातला आहे. विशेष म्हणजे बहुतांश रस्त्यांवर आधीच फुटपाथ सुस्थितीत आहेत. केवळ दुरुस्तीच्या नावाखाली ही कामे पुन्हा केली जात आहेत.खड्डे बुजविण्यापेक्षा फूटपाथाच्या कामांना प्राधान्य देण्यामागे नेमके कारण काय, असा सवाल आहे.
पथ विभागाने गोल्या वर्षीच विनानिविदा १५ कोटी खर्च करून फूटपाथाची दुरुस्ती केली होती. ही १५ कोटींची कामे नेमकी कोणत्या रस्त्यांवर, कोणत्या फुटपाथवर, कधी आणि कोणत्या स्वरूपात केली याची माहिती आलेली नाही. पुन्हा ८८ कोटींच्या कामांची तयारी केल्याने पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
निविदेत स्पर्धा होणार का ?
पथ विभागाने सात दिवसांची अल्पमुदतीची निविदा काढण्याच्या प्रस्ताव मंजुरीसाठी दिला असून स्पर्धा होऊन अनुभवी कंत्राटदारांकडून निविदा प्राप्त होतील, असा दावा केला आहे. एकीकडे खड्डे बुजविण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना निधी दिला आहे. आता अस्तित्वातील फूटपाथाच्या दुरुस्तीवर कोट्यवधी खर्च होणार आहे. प्रशासनाने सातच दिवसांची मुदत दिल्याने काही ठराविक ठेकेदार कामांसाठी पात्र होतील.
हे फूटपाथ आधीच सुस्थितीत
जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, कर्वे रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, सेनापती बापट रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, विद्यापीठ रस्ता, औंध रस्ता, पाषाण रस्ता, बाणेर रस्ता, औंध आयटीआय रस्ता यांसह अनेक प्रमुख रस्त्यांवर यापूर्वीच फुटपाथची कामे झाली आहेत.
पुणे स्टेशन, ढोले पाटील रस्ता, कोरेगाव पार्क, हडपसर, मुंढवा, कोंढवा, बिबवेवाडी, सहकारनगर, शिवदर्शन, सॅलसबरी पार्क आदी भागांतही फुटपाथ आहेत. त्यामुळे ८८ कोटींच्या प्रस्तावात नेमक्या कोणत्या भागात नवीन कामे केली जाणार आहेत, हे स्पष्ट होत नाही.
केवळ निधी खर्ची पाडण्यासाठी जुने फुटपाथ काढून नवीन करण्याचा हा प्रकार थांबवला पाहिजे. विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून गरज, आवश्यकता आणि सर्वेक्षणाच्या आधारेच प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे.





