Pune : महापालिकेच्या शाळा वाऱ्यावर; शिक्षकांची तब्बल २४७ तर मुख्याध्यापकांची ५७ पदे रिक्त

डॉ. राजू गुरव
पुणे – महापालिका शाळांमध्ये शिक्षकांची तब्बल २४७ तर मुख्याध्यापकांची ५७ पदे रिक्त आहेत. यामुळे या शाळांतील विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर असल्याची अवस्था आहे. तात्पुरती सोय म्हणून रिक्त पदांवर हंगामी शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या असल्या तरी हंगामी शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणा का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शाळांमधील विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदे निश्चित करीत संचमान्यता घेणे बंधनकारक असते. आरक्षणाबाबतची बिंदुनामावली (रोस्टर) मागासवर्गीय कक्षाकडून मंजूर करून घ्यावी लागते. परंतु, शिक्षण विभागाकडून संचमान्यतेला स्थगिती दिल्यामुळे पालिकेच्या शाळांची संच मान्यता रखडली आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी आवश्यक ती प्रक्रियाही महापालिकेने पूर्ण केलेली नाही. यामुळे बहुसंख्य शाळांमध्ये शिक्षकच नाहीत.
महापालिकांच्या ३१३ शाळांसाठी २३३ मुख्याध्यापकांची पदे मंजूर आहेत. त्यातील १७६ पदे भरण्यात आली असून ५७ जागा रिक्तचआहेत. त्यामुळे बहुसंख्य शाळांना पूर्णवेळ मुख्याध्यापकही नसल्याची बाब उघड झाली आहे. पदवीधर शिक्षकांची ८१९ पदे मंजूर असताना त्यातील ५८० शिक्षक कार्यरत आहेत. पदवीधर शिक्षकांची २३९ पदे रिक्तच आहेत. अपदवीधर शिक्षकांची १ हजार ७९० पदे मंजूर असून त्यातील १ हजार ७८२ जागा भरल्या आहेत. अपदवीधरच्या ८ जागा रिक्तच आहेत.
यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी महापालिकेतील शिक्षकांची रिक्तपदे सहा-सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मानधनावर हंगामी स्वरुपात भरण्यात येणार आहेत. प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे शिक्षकांना मानधन देण्यात येणार आहे. या हंगामी शिक्षक भरतीची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यात येणार आहे. – विजयकुमार थोरात, उपायुक्त, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे महापालिका
आंतरजिल्हा बदलीची प्रकरणेही धुळखात
आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून महापालिका शाळांमध्ये येण्याबाबतच्या २१९ शिक्षकांचे प्रस्ताव गेल्या एक-दीड वर्षांपासून धुळखात पडले आहेत. बाहेरच्या जिल्ह्यातून काही शिक्षकांच्या समायोजनाचेही प्रस्तावही आहेत. जिल्हाअंतर्गत बदलीची प्रकरणे निकाली निघालेली नाहीत.
संबंधित शिक्षक प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी फेलपाटे मारुन कंटाळले आहेत. मात्र, महापालिकेकडून त्यांना काहीच दाद मिळत नाही. पत्राला उत्तरही दिले जात नाही. त्यामुळे संबंधित शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मनपा शाळांतील सद्यस्थिती
माध्यमनिहाय शाळा – मंजूर शिक्षक – कार्यरत शिक्षक – रिक्त जागा
मराठी – २३४- १९१२- १८०० – ११२
इंग्रजी – ४६ – ४८२ – ३६८ – ११४
उर्दू – ३१- २०३ – १८४ – १९
कन्नड – २ – १२- १० – २
एकुण – ३१३ – २६०९-२३६२- २४७





