Pune : निवडणुकीसाठी महापालिकेची लगबग; प्रशासनाकडून २३ कक्षांची स्थापन

पुणे – महापालिका निवडणुकांच्या तयारीसाठी महापालिका प्रशासनाकडून वेगवेगळ्या तब्बल २३ कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षांचे काम करण्यासाठी अधिकारीही नियुक्त करण्यात आले असून, त्यांनी तत्काळ कामाला सुरुवात करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नुकतेच काढले आहेत.
या कक्षांमध्ये निवडणूक कर्मचारी व व्यवस्थापन कक्ष, मतदान केंद्र सुविधा कक्ष, थकबाकी ना हरकत प्रमाणपत्र कक्ष, मतमोजणी कक्ष अशा वेगवेगळ्या कक्षांचा समावेश आहे. या कक्षांच्या कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या या अधिकाऱ्यांच्या सेवाही अधिग्रहित करण्यात आल्या असून, या कक्षांनी वेगवेगळ्या टप्प्यात करण्यात आलेल्या कामांचा अहवाल महापालिका आयुक्तांना तत्काळ सादर करायचा आहे.
तसेच कक्षासाठी कर्मचारी कक्षप्रमुखांनी उपलब्ध करून घ्यायचे असून, या कोणत्याही कक्ष प्रमुखांनी थेट निवडणूक आयोग अथवा राज्यशासनाशी संपर्क न साधता उपायुक्त निवडणूक यांच्यामार्फतच संपर्क साधायचा आहे, तसेच निवडणूक संपेपर्यंत ही जबाबदारी संबधितांवर असणार आहे.
या कक्षांची केली स्थापना
निवडणूक कर्मचारी व व्यवस्थापन, मतदान केंद्र व सोयीसुविधा, टपाली मतपत्रिका व्यवस्थापन, थकबाकी ना हरकत प्रमाणपत्र, मतदान व मतमोजणी, स्टेशनरी, साहित्य वितरण, माहिती व जनसंपर्क, दूरसंचार सुविधा, बैठकांचे आयोजन, आचारसंहिता, विद्रूपीकरण कारवाई, पेड न्यूज, वाहतूक व्यवस्थापन, सभा मंडप परवानगी, विद्युत व्यवस्थापन, माहिती व तंत्रज्ञान, ई. व्ही. एम व्यवस्थापन, समन्वय, निवडणूक खर्च, विधी, आरोग्य, पाणीपुरवठा व्यवस्थापन.





