Pune: अफवांवर विश्वास ठेवू नका प्रभाग रचनेबाबत महापालिकेचे आवाहन

पुणे – पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना प्रक्रिया प्रारंभ झाली असून, सद्यःस्थितीत जनगणना कार्यालयाकडून प्राप्त झालेली माहिती तपासण्याचे काम सुरू आहे. स्थळ पाहणी, प्रगणक गटांची पडताळणी अशी पूर्वतयारी सुरू असून, अंतिम रचनेपासून ही प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे प्रभाग रचनेबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
काही राजकीय पक्षांकडून तसेच माध्यमांतून प्रभाग रचनेचे काम झाले असून, त्यात राजकीय हस्तक्षेप करण्यात आल्याचे आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून हे आवाहन करण्यात आले असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकार दिवटे यांनी स्पष्ट केले.
दिवटे म्हणाले की, महापालिकेकडून प्रारूप प्रभाग रचना निश्चित केल्यानंतर ती प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येतील आणि सुनावणीनंतर अंतिम रचना जाहीर केली जाणार आहे. प्रभाग रचनेसंदर्भातील काम हे गोपनीय स्वरूपाचे असून, सध्या कोणताही नकाशा तयार करण्यात आलेला नाही.
ही सद्यःस्थिती असताना काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधींकडून करण्यात आलेल्या आरोपांच्या आधारांवर माध्यमांमधून दिशाभूल करणाऱ्या बातम्याही प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही अप्रामाणिक माहितीवर विश्वास ठेवू नये, अफवांपासून दूर राहावे आणि अधिकृत माहिती महापालिकेच्या या संकेतस्थळावरून घ्यावी, असे आवाहनही दिवटे यांनी केले आहे.





