पुणे – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात कचरा आणि अस्वच्छता असल्याने प्राणी आणि पक्ष्यांचा वावर अधिक आहे. परिणामी, विमानसेवेत अनेकवेळा अडथळे येत आहेत. त्यामुळे ही समस्या तत्काळ सोडविण्याबाबत महापालिका, विमानतळ प्राधिकरण आणि हवाई दलाने समन्वयाने काम करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी सूचना केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिकेत बैठक घेतली. यावेळी आयुक्त नवलकिशोर राम, विमानतळ संचालक संतोष डोके यासह वायुदल आणि वाहतूक पोलीस अधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मोहोळ म्हणाले की, विमानतळ परिसरात कचरा टाकला जाणारी १८ ठिकाणे (क्रॉनिक स्पॉट्स) विमानतळ प्रशासन आणि हवाई दलाने शोधून काढली आहेत. वाघोली येथील मंडई, हडपसर येथील कचरा वर्गीकरण प्रकल्प आदी ठिकाणांचा समावेश आहे. काही ठिकाणी अनधिकृत व्यवसायामुळे कचरा निर्माण होत आहे. यासाठी स्थिर पथके नेमून नियमित कारवाई करावी. येरवडा कारागृहापासून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्ता रुंदीकरण कामासाठी संरक्षण विभागाने परवानगी (वर्किंग परमिशन) दिली असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले. बिबट्यासाठी पिंजरे… विमानतळ परिसरात आढळून आलेल्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागासह यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत. विमानतळ परिसरात येणारी भटकी कुत्री आणि अन्य प्राणी यामुळे बिबट्याला खाद्य मिळत होते. त्यामुळे बिबट्याचे विमानतळात येण्याचे आणि बाहेर जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले असून, पिंजरेही लावण्यात आले आहेत. लवकरच बिबट्या ताब्यात येईल, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.