Pune : रूफ टॉप हॉटेलांवर महापालिकेची कारवाई; बाणेर परिसरातील अतिक्रमण हटविली

औंध – बाणेर परिसरामध्ये अनेक हॉटेल व्यवसायिकांनी अनधिकृतरित्या इमारतींच्या टेरेसवर रूफ टॉप हॉटेल चालू करून त्या ठिकाणी पब व बार सुरू केले. अशा हॉटेलांबाबत अनेक वेळा परिसरातील नागरिकांकडून तक्रारी आल्याने अशा हॉटेल व्यावसायिकांना महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने नोटीसही पाठविण्यात आल्या, मात्र त्यानंतरही अशी हॉटेल सुरूच असल्याने अखेर मनपाकडून बाणेर परिसरात कारवाई करीत अशा हॉटेलांचे बांधकाम पाडण्यात आले.
पुणे महापालिका बांधकाम विकास विभाग झोन तीन तर्फे बाणेर परिसरामध्ये रूफ टॉप हॉटेल व साईड मार्जिन मध्ये अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली. इमेज रेस्टो बार, ऑफिम रुफ टॉप बार, ह्यूमन्स बार या हॉटेलांच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली. यावेळी एकूण आठ हजार तीनशे चौरस फूट क्षेत्र रिकामे करण्यात आले. अशीच कारवाई मागील आठवड्यात (दि. 6 सप्टेंबर) करण्यात आली होती.
त्यावेळी क्लब फाइल आणि इमेज रेस्टॉरंट ऍन्ड बार या हॉटेलचे अतिक्रमण हटविण्यात आले होते. ही कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता निवृत्ती पुतळे, कनिष्ठ अभियंता अजित सणस व संदीप चाबुकस्वार यांच्या पथकाने केली.





