चला पणती लावूया…

पुणे – दीपावली म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव! वीजेवर लावता येणारे कितीही प्रकारचे दिवे उपलब्ध असले; तरी दिवाळीत पणत्यांचे महत्त्व ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ आहे. या पणत्यांचे अनेक नावीन्यपूर्ण प्रकार बाजारपेठेत दाखल झाले आहेत.
सध्या कुंभारवाडा परिसर तसेच उपनगरांतील विविध रस्त्यांवर पथारी व्यावसायिकांकडे पणत्या दिसून येत आहेत. त्यामध्येही अनेक व्हरायटी असून, साध्या पणत्यांपासून ते टेराकोटाच्या, लामण दिवा, पाच सात पणत्यांची जोड असलेले चक्राकार तबक, दीपमाळेप्रमाणे पणत्यांची माळ असे अनेक प्रकार यामध्ये दिसून येत आहे.अनेक किरकोळ व्यावसायिक कुंभारवाडा परिसरातून होलसेलमध्ये खरेदी करून आपापल्या भागात पणत्या विकतात. त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.
पारंपरिक पणत्यांव्यतिरिक्त व्यावसायिकांनी स्पर्धेच्या दृष्टीने “इनोव्हेशन’ करून अनेकविध आकाराच्या पणत्या घडवल्या आहेत. त्यातल्याच एक म्हणजे भिंतीवर कोनाड्याचा आकार बनवून त्यातल्या पणत्या, अडकवण्याचा लामणदिवा, कंदिलासारख्या आकाराचे दिवे. हत्तीच्या पाठीवर ठेवलेले दिवे, मोराच्या आकाराचे, समईसारखे, जाळीदार दिवे पाहायला मिळत आहेत. दीडशे-अडीचशेपासून ते चार-पाचशे रुपयांपर्यंतचे दिवे उपलब्ध आहेत.
पूर्वी पारंपरिक गोल आकाराच्या पणत्या होत्या. त्या हाताने तयार करून त्याला लाल रंगाचे काव लावले जात असे. मात्र, आता टेराकोटा मातीच्या प्रकारातील पणत्यांची संख्या जास्त आहे. कोयरी, आंबा, स्वस्तिक, पान, फुलांचा, पंचपाळाचा आकार अशा विविध आकाराच्या डिझाइनच्या पणत्या उपलब्ध असून, त्या 30 ते 40 रुपये डझनाने उपलब्ध आहेत.
दहा टक्के दरवाढ
यंदा पणत्यांची सुमारे दहा टक्के दरवाढ झाली असून, माती आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्याने पक्क्या मालाच्याही किंमती वाढल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
“सध्या शाळांच्या सहामाही परीक्षा सुरू असल्यामुळे चित्र आणि तयार किल्ले खरेदीसाठी मुलांची गर्दी अद्याप झाली नाही. त्या संपल्या, की मुलांबरोबर पालकांचीही पणत्या खरेदी होते.” – दीपा कुंभार, पणती विक्रेत्या व्यावसायिक





