Pune Mumbai Railway: पुणे-मुंबईकरांना मोठा दिलासा! ‘डेक्कन क्वीन’ आणि ‘इंटरसिटी’ आजपासून पुन्हा धावणार
Pune Mumbai Railway: दरड दुर्घटनेनंतर १० दिवसांनी पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक पूर्ववत; डाउन लाइनवरून तीन मालगाड्यांची यशस्वी चाचणी घेऊन रेल्वे सुरू.

Pune Mumbai Railway – लोणावळा- कर्जत घाटातील डाउन रेल्वे लाइन १० दिवसांनंतर पूर्ववत झाली आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली लाडकी डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेस आजपासून (दि. १६ जुलै) पुन्हा धावणार आहेत. दि. ६ जुलै रोजी झालेल्या दरड दुर्घटनेनंतर मागील दहा दिवसांपासून मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. त्यानंतर रेल्वेचे बाराशेहून अधिक कर्मचारी, अभियंत्यांनी अवजड यंत्रसामग्रीसह घाटात अहोरात्र राबून दि. ७ जुलैला मिड-लाइन, तर १४ जुलैला डाउन लाइन सुरू केली असून,
आता तिसरी अप-लाइन पूर्ववत करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. लोणावळा-कर्जत घाटातील डाउन लाइनचे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावरून तीन मालगाड्या सुरक्षितपणे चालवल्यानंतर, पहिली प्रवासी ट्रेन सीएसएमटी-लातूर एक्सप्रेस कर्जतहून रवाना झाली. या महत्त्वाच्या लाइनच्या दुरुस्तीमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून,
पुणे-मुंबई दरम्यान धावणारी आणि चाकरमान्यांची जीवनावाहिनी असलेली सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेस यांची सेवा गुरुवार दि. १५ पासून पूर्ववत होईल. आता तिसरी म्हणजेच अप-लाइन पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मलबा आणि ढिगारे वेगाने हटविण्यासाठी बोल्डर स्पेशल ट्रेन, युनिमॅट मशिन, जेसीबी यांसारख्या यंत्रसामग्रीची मदत घेतली जात आहे. प्रवाशांनी रेल्वे हेल्पलाइन किंवा एनटीईएस ॲपद्वारे गाड्यांची माहिती घेऊन प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.




