Old Pune-Mumbai highway: जुन्या पुणे-मुंबई महामार्गाला अतिक्रमणांचा विळखा; व्यावसायिकांसह प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

स्वप्निल काळे
Old Pune-Mumbai highway: राज्यातील अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अलिकडच्या काळात अतिक्रमणाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे.
या मार्गावर उभारण्यात आलेल्या लहान व्यावसायिकांच्या तात्पुरत्या दुकानांमुळे वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता अधिकच तीव्र होत चालली आहे.
या महामार्गावर गेल्या काही वर्षांत प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जुन्या महामार्गाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
विशेषतः स्थानिक प्रवासी, दुचाकीस्वार आणि हलक्या वाहनांसाठी हा मार्ग सोयीचा मानला जातो. मात्र या वाढत्या वापरासोबतच रस्त्याच्या कडेला अनियंत्रितपणे उभारल्या जाणाऱ्या दुकानांची संख्या वाढत गेली आहे.
उसाचा रस, फळे, पाण्याच्या बाटल्या, स्नॅक्स, चहा तसेच प्रवासादरम्यान लागणाऱ्या विविध छोट्या वस्तू विकणारी दुकाने मोठ्या प्रमाणावर उभी राहत आहेत. सुरुवातीला काही ठिकाणी मर्यादित स्वरूपात असलेली ही दुकाने आता अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेली दिसतात.
काही ठिकाणी तर रस्त्याच्या कडेला जागा अपुरी पडल्याने दुकानांची रचना थेट रस्त्याकडे झुकलेली दिसते. परिणामी वाहनांसाठी उपलब्ध असलेली जागा कमी होत आहे.
अनेकदा प्रवासी या दुकानांवर खरेदीसाठी थांबत असताना चारचाकी आणि दुचाकी वाहने थेट रस्त्याच्या कडेला उभी करतात. तर काहीजण कोणताही पूर्वसंकेत न देता थांबतात. अशा परिस्थितीत मागून येणाऱ्या वाहनांना वेळेत प्रतिक्रिया देणे कठीण जाते.
महामार्गावरील वाहने सहसा जास्त वेगाने प्रवास करत असतात. अशा वेळी रस्त्यावर अचानक निर्माण होणारे अडथळ्यांमुळे अपघाताचा धोका अधिकच वाढतो. विशेषतः ज्या ठिकाणी रस्ता वळणदार आहे, त्या भागात हा धोका अधिक तीव्र होतो. अशा ठिकाणी वाहनचालकांना पुढील परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी कमी वेळ मिळतो.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अतिक्रमणाचा प्रश्न हा केवळ स्थानिक पातळीवरील अडचण नसून, तो सार्वजनिक सुरक्षेशी निगडित आहे. रस्त्याचा वापर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी हा मुद्दा गांभीर्याने हाताळणे आवश्यक आहे. अन्यथा वाढत्या अतिक्रमणामुळे आणि अनियंत्रित वाहतुकीमुळे भविष्यात गंभीर अपघातांचा धोका अधिक वाढू शकतो.
रात्री समस्या होते अधिक गंभीर
अनेक ठिकाणी पुरेशी प्रकाशयोजना नसल्यामुळे वाहनचालकांना रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने किंवा दुकाने स्पष्टपणे दिसत नाहीत. काही दुकानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रकाशामुळे चालकांचे लक्ष विचलित होण्याची देखिल शक्यता असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका आणखी वाढतो.
Pune District : लोकअदालतीत 671 प्रकरणे निकाली; राजगुरूनगर येथे विविध प्रकरणांमध्ये दोन कोटींची वसुली





