Pune-Mumbai Highway: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर जलद वाहतुकीसाठी उभारण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरमुळेच मंगळवारी (दि. २४) पिंपरीतील मोरवाडी येथे तब्बल १२ तासांची वाहतूक कोंडी निर्माण झाली. पहाटे साडेचारच्या सुमारास एक मालवाहू कंटेनर ग्रेड सेपरेटरमध्ये अडकल्याने सकाळपासून केवळ एकच लेन सुरू होती. सायंकाळी साडेचारपर्यंत प्रयत्नांनंतर अखेर कंटेनर हटवण्यात पोलिसांना यश आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेने आकुर्डी, चिंचवड आणि पिंपरी येथे वाहतूक सुरळीत आणि जलदगतीने व्हावी, यासाठी ग्रेड सेपरेटर उभारले आहेत. मात्र सेपरेटरची उंची आणि जड वाहनांच्या उंचीतील तफावत याकडे पुरेसे लक्ष न दिल्याने यापूर्वीही कंटेनर अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी घडलेली घटना त्याच मालिकेतील आणखी एक प्रकार ठरली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंटेनर चालकाने पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास मोरवाडी येथील ग्रेड सेपरेटरमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला वाहन आत गेले; मात्र मध्यभागी पोहोचताच कंटेनर छताला अडकला आणि पूर्णपणे थांबला. वाहन मागे घेणे किंवा पुढे सरकवणे अशक्य झाल्याने परिस्थिती गंभीर बनली. वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कंटेनर बाहेर काढण्यासाठी प्रथम मागील चाकांमधील हवा सोडण्यात आली, जेणेकरून वाहनाची उंची काही प्रमाणात कमी होईल. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने कंटेनर ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कंटेनर ग्रेडसेपरटेरमधून बाहेर आल्यावर काढलेली चाकातील हवा भरण्यासाठी मागील चाकांना जॅक लावण्यात आला. मात्र जॅक अडकून पडल्याने कामात आणखी विलंब झाला. जॅक काढण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ व साधनसामग्री बोलवावी लागली. त्यामुळे पहाटेपासून सुरू झालेली कोंडी दुपारपर्यंत कायम राहिली. दरम्यान, सकाळी कार्यालयीन वेळ सुरू होताच वाहनांच्या रांगा वाढत गेल्या. दुचाकीस्वार, चारचाकी चालक, बस प्रवासी आणि शालेय विद्यार्थी वाहतूक कोंडीत अडकले. अनेकांना कामावर व शाळेत पोहोचण्यास उशीर झाला. काही वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब केला; मात्र त्याठिकाणीही मोठी कोंडी झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली. सुमारे १२ तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास कंटेनर हटवण्यात यश आले आणि वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. मात्र या घटनेने नागरिकांचा संयम सुटला असून भविष्यात अशी वेळ येऊ नये यासाठी महापालिकेने तातडीने तांत्रिक पाहणी करून आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. हाइट बॅरियर निष्प्रभ या घटनेमुळे ग्रेड सेपरेटरच्या रचनेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महापालिकेने सेपरेटरच्या आधी ‘हाइट बॅरियर’ उभारले असले तरी त्यांची उंची साडेचार मीटरपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. परिणामी, उंच कंटेनर ते सहज पार करून पुढे जातात; मात्र प्रत्यक्ष ग्रेड सेपरेटरमध्ये जाऊन अडकतात. त्यामुळे लावलेले हाइट बॅरियर निष्प्रभ ठरत असल्याची टीका वाहनचालकांनी केली आहे. पर्यायी मार्ग निश्चित करा हाईट बॅरियरची उंची योग्य प्रमाणात कमी केली, तर जड वाहने आधीच थांबतील आणि सेपरेटरमध्ये अडकण्याचे प्रकार टाळता येतील, असे काही वाहनचालकांचे मत आहे. याशिवाय स्पष्ट सूचना फलक, इशारे आणि जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्याची मागणीही होत आहे. Madhuri Misal : राज्यमंत्र्यांनी मागितला पालिकेकडे खुलासा; पर्वती मतदारसंघ निधी प्रस्तावावरून वाद