Kerala : दहा वर्षांनंतर केरळच्या राजकारणात मोठा राजकीय उलटफेर घडवत काँग्रेस नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) पुन्हा एकदा सत्तेत आला आहे. डाव्या आघाडीच्या सलग दोन कार्यकाळानंतर जनतेने यावेळी बदलाला पसंती दिली असून वडास्सेरी दामोदर मेनन सतिशन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नव्या सरकारची धुरा सांभाळली. तिरुवनंतपुरममध्ये पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. तिरुवनंतपुरमच्या सेंट्रल स्टेडियममध्ये राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी सतिशन आणि त्यांच्या २० सदस्यीय मंत्रिमंडळाला पद व गोपनीयतेची शपथ दिली. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात यूडीएफने आपली ताकद दाखवून दिली. निवडणुकीत मिळालेल्या स्पष्ट जनादेशानंतर नव्या सरकारने पहिल्याच दिवशी मोठ्या लोकाभिमुख घोषणा करत जनतेचे लक्ष वेधून घेतले. (Kerala ) शपथविधीनंतर झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत महिलांसाठी मोफत बसप्रवास योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. १५ जूनपासून केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच केएसआरटीसीच्या बसमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. Kerala : मोफत बस प्रवास ते दरमहा ३ हजार रुपये..! काँग्रेस सत्तेत येताच केरळमध्ये महिलांसाठी घेतले अनेक मोठे निर्णय महागाई आणि वाढत्या प्रवासखर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महिलांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. विशेषतः कामगार महिला, विद्यार्थिनी, नोकरदार आणि ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा मोठा फायदा होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. वृद्धांच्या आरोग्य, सुरक्षा, सामाजिक संरक्षण आणि कल्याणकारी योजनांवर लक्ष केंद्रित करणारा असा स्वतंत्र विभाग स्थापन करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचा दावा मुख्यमंत्री सतिशन यांनी केला. वृद्धांची वाढती संख्या आणि त्यांच्या समस्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. नव्या सरकारने आरोग्य आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील आशा सेविकांच्या मानधनात दरमहा ३ हजार रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे मासिक मानधन आता १२ हजार रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. (Kerala ) कोरोना काळात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा सेविकांच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित होत्या. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका, मदतनीस, शालेय स्वयंपाक कर्मचारी, पूर्वप्राथमिक शिक्षक आणि आया यांच्या मानधनातही वाढ जाहीर करण्यात आली. त्यामुळे निम्न व मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबतही राजकीय चर्चांना वेग आला आहे. यूडीएफमधील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक असलेले रमेश चेन्नीथला यांच्याकडे गृह आणि दक्षता खात्याची जबाबदारी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ६९ वर्षीय चेन्निथला हे तिसऱ्यांदा मंत्री झाले असून १९८६ मध्ये अवघ्या २८व्या वर्षी मंत्री बनण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. प्रशासनातील अनुभव आणि संघटन कौशल्यामुळे सरकारमध्ये त्यांना महत्त्वाचे स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.