Pune: एमपीएससीची टंकलेखन कौशल्य चाचणी लांबणीवर

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा १ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. टंकलेखन कौशल्य चाचणीदरम्यान उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नियोजित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणीची पुढील तारीख स्वतंत्रपणे घोषित करण्यात येईल, असे आयोगाने कळविले आहे. या परीक्षेमधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गासाठी टीसीएस या सेवा पुरवठादार संस्थेमार्फत दिनांक १ ते १३ जुलै रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित केली होती.
मात्र, दि. १ जुलै रोजी प्रथम सत्रासाठी उपस्थित उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणीदरम्यान काही तांत्रिक अडचणी उद्धभवल्यामुळे चाचणी पूर्ण होऊ शकली नाही. यामध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीचे निराकरण करण्यासाठी लागू शकणारा वेळ विचारात घेऊन दिनांक १ ते ३ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.




