MPSC Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला धनंजय मुंडेंचा पाठिंबा; मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावण्याचे आश्वासन
MPSC Protest : पुण्यातील एमपीएससी परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला धनंजय मुंडेंनी पाठिंबा दिला. विद्यार्थी प्रतिनिधींसह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागण्यांवर चर्चा करण्याचे आश्वासन.

MPSC Protest : राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्ष व सचिवांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी भेट देऊन पाठिंबा दिला. औषध निरीक्षक परीक्षेतील गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
परीक्षा पद्धतीत सुधारणा करणे, त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणे, परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर तयार करून त्याचे पालन करणे, वर्णनात्मक परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देणे आणि परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेणे, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
या मागण्यांबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. पुढील आठवड्यात विद्यार्थी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासह मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न व पाठपुरावा करणार असल्याचे मुंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.
परीक्षा आणि अन्य प्रक्रियांचे वार्षिक कॅलेंडर निश्चित करावे. तसेच पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकरणांतील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आगामी अधिवेशनात विशेष कायदा आणण्याबाबतही मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या पाठीशी आपण उभे असून आंदोलनातून त्यांना न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाणे, विद्यार्थी आंदोलक अरविंद वालेकर, मनोज पिंगळे, राम कदम, अनिल देवकाते, नितीन आंधळे, धुळदेव टेळे यांच्यासह हजारो विद्यार्थी उपस्थित होते.





