Pune : एम.पी.एस.सी.चा पेपर ४० लाखाला; कॉल करणारे तीघे अटकेत

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची रविवारी (दि.२) महाराष्ट्र गट ब (अराजपत्रीत) सेवा संयुक्त पुर्व परिक्षा घेण्यात येणार आहे. या परिक्षेपूर्वी नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका व अन्सर की ४० लाखात देतो, असे कॉल येत होते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पेपर फुटल्याची चर्चा सुरू झाली होती. याची दखल घेत लोकसेवा आयोगाने पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पुणे पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून नागपूर पोलिसांच्या मदतीने एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे विद्यार्थ्यांची फोन नंबरसह यादी सापडली आहे.
उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे यांनी सांगितले की, दिपक दयाराम गायधने ( २६ रा. चाकण, मुळ तामसवाडी,जि. भंडार) आणि सुमित कैलास जाधव ( २३ रा., चाकण, मुळगाव नांदगाव, जि. नाशिक) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर योगेश सुरेंद्र वाघमारे (रा. सोनाली ता. वराठी, जि. भंडारा) याला ताब्यात घेण्यात आले. गायधने आणि जाधव हे म्हाळुंगे एमआयडीसीमध्ये टेक्निशिअन म्हणून काम करतात. तर वाघमारे हाही आयटीआय झाला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक हे करीत आहेत. यातील आरोपींकडे नाशिक येथील २४ उमेदवाराची यादी तसेच नागपूर मधील संशयितांकडे काही याद्या कशा प्राप्त झाल्या आहेत. या यादीतील उमेदवार यावर्षी परिक्षेला बसलेले आहेत का ? याबाबत तपास सुरु आहे. अदयापर्यंतच्या तपासात पेपर फुटल्याचे निष्पन्न झालेले नाही. याप्रकरणाचा तपास हा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
खरा सुत्रधार कोण ?
परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची यादी खासगी क्लासचालकांनी दिली आहे का? याचाही तपास केला जात आहे. आरोपींपैकी एकही पदवीधर नाही. यामुळे त्यांना एमपीएससी परिक्षेचा कोणताही अनुभव नाही. यामुळे खरा सुत्रधार वेगळाच असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.





