पुणे – शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी, तसेच जबरी चोरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील भुरिया टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. टोळीप्रमुख सुंदरसिंग भायानसिंग भुरिया (वय २५), मुकेश ग्यानसिंग भुरिया (२७), सुनील कमलसिंग आलावा (२८), हरसिंग वालसिंग ओसनिया (२२, सर्व रा. पिपरानी, कुक्षी, मध्यप्रदेश) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. दि. ६ ऑक्टोबर रोजी बोपोडी परिसरात अयोध्यानगर येथे सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की करुन रोकड चोरुन नेली होती. भुरिया टोळीने शहरात यापूर्वी घरफोडीचे गुन्हे केले होते. भुरिया टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने, गुन्हे शाखेचे निरीक्षक मानसिंग पाटील, उपनिरीक्षक वैभव मगदूम, संतोष भांडवलकर यांनी तयार केला होता. परिमंडळ चारचे उपायुक्त शशिकांत बाेराटे, अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठविण्यात आला. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी भुरिया टोळीविरुद्ध मोक्का कारवाईचे आदेश दिले. रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ९० गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.