Pune Crime : वर्षभरापासून फरार ‘मोक्का’तील दोघे पोलिसांच्या जाळ्यात; एकाला खिडकीतून पळताना, दुसऱ्याला वडापावच्या दुकानामागे पकडले
Pune Crime : पुण्यात निलेश घायवळ टोळीविरुद्धच्या मोक्का गुन्ह्यात वर्षभरापासून फरार असलेल्या संतोष धुमाळ आणि विपुल माझिरेला कोथरूड पोलिसांनी अटक केली.

Pune Crime : गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या निलेश घायवळ टोळीविरुद्ध दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यात तब्बल वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन पाहिजे आरोपींना कोथरूड पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात संतोष अनंत धुमाळ आणि विपुल उत्तम माझिरे (३०) हे दोघेही अलगद जाळ्यात अडकले. विशेष म्हणजे, पोलिसांची चाहूल लागताच धुमाळने फ्लॅटच्या खिडकीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले. त्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे काही तासांतच दुसऱ्या आरोपीलाही बालगंधर्व चौकातून जेरबंद करण्यात आले.
कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी निलेश घायवळ टोळीविरुद्ध दोन स्वतंत्र मोक्का कारवाया करण्यात आल्या होत्या. या गंभीर गुन्ह्यातील संतोष धुमाळ आणि विपुल माझिरे हे दोघेही वर्षभरापासून फरार होते. विपुल माझिरे हा शार्प शुटर म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे.
पत्नीला भेटायला आला आणि पोलिसांनी टाकला घेरावा-
फरार संतोष धुमाळचा शोध सुरू असताना पोलीस हवालदार राजेंद्र लांडगे यांना तो पत्नीला भेटण्यासाठी कोथरूड गावठाणातील गुलमोहर सोसायटीत येणार असल्याची खबर मिळाली. ही माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घुले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सोसायटीभोवती सापळा रचला.
सोसायटीत ये-जा करणाऱ्या मार्गांसह लिफ्ट परिसरात पोलिसांनी दबा धरला. पोलिसांकडून एका फ्लॅटची तपासणी सुरू असताना धुमाळ पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने खिडकीतून बाहेर पडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला पकडून ताब्यात घेतले.
धुमाळची चौकशी केल्यानंतर पोलिसांना विपुल माझिरेबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. विपुल हा संतोषला भेटण्यासाठी बालगंधर्व चौकातील जोशी वडेवाले दुकानाच्या मागे येणार असल्याचे पोलिसांना समजले.
त्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने बालगंधर्व चौकात पोहोचले. दुकानाच्या मागील बाजूस दबा धरून पोलिसांनी सापळा रचला. काही वेळातच विपुल माझिरे तेथे संतोषला भेटण्यासाठी आला. पोलिसांनी योग्य संधी साधत त्याला जागीच ताब्यात घेतले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त डॉ. सागर कवडे आणि सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, सुनील कारोटे आणि सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घुले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार राजेंद्र लांडगे, पठाण, सोनावणे, दगडे, लोखंडे तसेच पोलीस शिपाई पांढरे, शिर्के, डोंगरे आणि जमदाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.





