Pune : शिवसेनेकडून मिशन पुणे ; नाराजांच्या भेटीगाठी

कोथरूड : पक्षाची ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेने मिशन पुणे हाती घेत नाराजांना आपल्याकडे वळविण्यासाठी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. शनिवारी (दि. १) उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी कोथरूड विधानसभेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या निवासस्थांनी जाऊन भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली. माजी आमदार महादेव बाबर त्यानंतर चंद्रकांत मोकाटे यांनी भेट घेतल्यामुळे मिशन पुणेमध्ये शिवसेनेकडून उध्दव ठाकरे यांचा पक्षातील आमदार आणि पदाधिकारी टार्गेट केले जात असल्याचे दिसून येते.
पुणे शहरात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी शिवसेना शहरप्रमुखांसह आमदार, मंत्रीमहोदयांकडून फिल्डिंग लावली जात आहे. त्यात नाराज आणि इच्छुक व्यक्तींना आपल्याकडे कसे घेता येईल, याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माजी आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी यांना टार्गेट केले जात आहे. त्यामध्ये आतापर्यंत काही नगरसेवक आणि पदाधिकारी शिवसेनेच्या कोट्यात आले. मात्र, अजूनही कात्रज, कोथरूड, खडकवासला, शिवाजीनगर यासह अन्य मतदारसंघात शिवसेनेची म्हणावी अशी ताकद नाही.
माजी आमदार महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे ते शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली. आता, मंत्री उदय सामंत यांनी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची निवासस्थानी जावून भेट घेतली. जवळपास तासभर त्यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे मोकाटे हे ही शिंदे गटात प्रवेश करणार का? उदय सामंत पुणे मिशनमध्ये मोकाटे यांना घेण्यात यशस्वी होणार का? प्रवेश कधी असणार अशी उलट-सुलट चर्चा शहरात सुरू झाली. मात्र, सामंत यांनी सांत्वनपर भेट दिल्याचे मोकाटे यांच्याकडून सांगण्यात आले.
मोकाटे-सुतार नाराजी पक्षाला डोकेदुखी…
विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी दिल्यामुळे इच्छुक पृथ्वीराज सुतार निवडणुकीत सक्रीय झालेच नाही. ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली, मात्र तसे काहीच झाले नाही. त्यानंतर मागील आठवड्यात एका कार्यक्रमात सुतार यांना मोकाटे यांच्या शेजारी बसविल्यामुळे मोकाटे नाराज होवून निघून गेले. त्याबाबत त्यांनी बोलूनही दाखविले. याच नाराजीचा फायदा शिवसेनेने घेत मोकाटे यांची भेट घेतली का? अशी चर्चा सुरू झाली.
पुण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही स्थिती…
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुण्याकडे फारसे लक्ष दिलेच नाही. त्यात पुण्यातील गटातटाचे राजकरणात चलता हे चलने दो, अशी भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेला महापालिकासह विधानसभेत समाधानकारक यश मिळाले नाही. त्यात शिवसेना फुटली, मात्र पुणे शहरातील बहुतांश माजी आमदार, माजी नगरसेवक आजही उध्दव ठाकरेंबरोबर आहेत. त्यामुळे ही ताकद कमी करण्यासाठी शिवसेनेकडून नाराजांना हेरण्याचा प्रयत्न सुरू आहे.





