Pune : अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार

पुणे : दुकानात निघालेल्या साडेअकरा वर्षाच्या मुलीचे दुचाकीवरुन अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपहरणाचा प्रकार वारजे भागात घडला तर बलात्काराचा प्रकार उत्तमनगर येथील एका लॉजवर घडला. याप्रकरणी अपहरण करणार्या दोघांसह लॉजमालक आणि व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडितेच्या वडीलांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल विनोदकुमार गौतम (२४, रा. अमरभारत सोसायटी, वारजे), अविनाश अशोक डोमपल्ले (२४, रा. वारजे), पिकॉक लॉजचा मालक भगवान दत्ता मोरे आणि व्यवहास टिकाराम चपाघई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार साडेअकरा वर्षाची पीडिता ही दुकानात जात असताना आरोपी राहुल आणि त्याचा मित्र अविनाश या दोघांनी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. त्यानंतर ते तिला उत्तमनगर येथील पिकॉक लॉजवर घेऊन गेले. तेथे राहुल गौतम याने तिला तु माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला मारून टाकेन अशी धमकी, देत तिच्यावर बलात्कार केला. मुलगी अल्पवयीन असतानाही लॉजचा मालक आणि व्यवस्थापकाने कोणतीही खात्री न करता तिला राहुल याच्यासोबत राहण्यास हरकत घेतली नाही, या कारणाने या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




