Pune : हिंजवडी ते शिवाजीनगर धावली मेट्रो

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या माण- हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे सुमारे 87 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम हे अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार शुक्रवारी या मेट्रो मार्गावर सुमारे चार किलोमीटरपर्यंत मेट्रोची चाचणी घेण्यात आली.
पीएमआरडीए, टाटा आणि सीमेन्स समूहाच्या नेतृत्वाखालील पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्यातील सार्वजनिक- खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलअंतर्गत विकसित केलेला हा प्रकल्प प्रगतिपथावर आहे. संबंधित प्रकल्पाच्या कामास २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरुवात झाली आहे.
माण -हिंजवडी ते शिवाजीनगर या सुमारे 23.3 किलोमीटर लांबीच्या मार्गावर 23 स्टेशन आहे. ही मेट्रो शिवाजीनगर येथे पुणे मेट्रो मार्गाला एकसंध असणार आहे. चार आधुनिक मेट्रो ट्रेनचा सेट आला आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये तीन पूर्णपणे वातानुकूलित डबे असून, त्याची एकूण प्रवासी क्षमता अंदाजे एक हजार आहे. ही मेट्रो ताशी ८० किलोमीटर वेगाने धावणार आहे.
शुकवारी मेट्रोची माण डेपो ते पहिल्या ४ स्थानकापर्यंत पहिलीच चाचणी घेण्यात आली. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे पुणे मेट्रो लाइन ३ कार्यान्वित होण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. या मेट्रोचे काम वेळेत पूर्ण होत असल्याने निश्चितच पुणे शहरासह संबंधित मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
‘माण- हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या कामाची मुदत मार्च २०२६ पर्यंत आहे. मात्र, वेळेआधीच मेट्रोचे काम पूर्ण करण्यास आमचे प्राधान्य आहे.’ – डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए





