पुणे : मेट्रोचा कारभार; रहिवाशांना शिक्षा

खोदकामानंतर वरवरची मलमपट्टी : पाइपलाइनही फुटलेलीच
कोथरूड – मेट्रो मुख्य स्टेशनला विद्युतपुरवठा करण्यासाठी लोकमान्य कॉलनी, शिक्षकनगर परिसरात खोदकाम करून केबल टाकण्यात आली. मात्र, हे खड्डे वरवरच “मलमपट्टी’करून बुजवण्यात आले. पदपथावर मातीचे ढिगारे पडून आहेत. तर खोदकामात फुटलेली पाइपलाइन आठ दिवसांपासून जैसे थे आहे. त्यामुळे आतापर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. मेट्रोच्या या कारभारामुळे पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कचरा डेपो येथे मेट्रोचे मुख्य स्टेशन तयार केले जात आहे. यासाठी लोकमान्य कॉलनी येथून मुख्य विद्युत वाहिनी टाकण्यात आली आहे. यासाठी रस्त्याकडेला खोदकाम करण्यात आले आहे. जवळपास दीड ते दोन मीटरचा हा टप्पा आहे. काम पूर्ण झाले, आता खोदलेला परिसर पुन्हा व्यवस्थित करून देणे ही जबाबदारी मेट्रोची आहे. मात्र, मेट्रोने वरचेवर माती टाकून हे “ब्लॉक’ बसवले आहेत.
तर, शिक्षकनगर येथील श्रीगीत सोसायटी आणि एसवीसी बॅंकेसमोर केलेल्या खोदकामात पाइनपलाइन फुटली आहे. तर, दिवाळीमुळे कामगार अर्धवट काम सोडून गेले. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून येथे पाणी वाहत आहे. जित मैदान येथील पाटील मंडपसमोरही मोठा खड्डा खोदण्यात आला आहे.
तेथे सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे चालावे कोठून? असा प्रश्न पादचाऱ्यांना पडत आहे. त्याबाबत मेट्रोच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो असता, “याबाबत आमच्याकडे तक्रारी आल्या असून, तात्काळ सर्व कामे पूर्ण केली जातील’ असे सांगण्यात आले.
असे फुटले भांडे
खड्ड्यांबाबत पतीत पावन संघटनेचे प्रांत संघटक सीताराम खाडे आणि स्थानिकांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना कामाच्या दर्जाबाबत विचारले. “तुम्ही जे ब्लॉक बसवले त्यावरून तुमचा जेसीबी घेऊन जा’ असे सांगतल्यावर तो जेसीबी नेताच सर्व ब्लॉक खचले आणि मेट्रो च्या कामाचे पितळ उघडे पडले. “तुम्ही वरच्या वर काम करून निघून जाणार. थोड्यादिवसाने हे ब्लॉक तुटणार, निघणार आणि लोकप्रतिनिधी पुन्हा त्यासाठी बजेट टाकणार. तुमच्या कारभाराची शिक्षा नेहमी नागरिकांना का?’ असा प्रश्न नागरिकांनी अधिकाऱ्यांना केला.





