Pune Metro : महापालिकेच्या शुक्रवारच्या सभेत पुणे मेट्रोच्या विस्ताराच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून आता मेट्रो सेवा पीएमआरडीएच्या हद्दीत पोहोचणार आहे. डोणजे, लोणीकंद, खेड शिवापूर तसेच उंड्रीपर्यंत मेट्रो सेवा विस्तारण्याच्या चार उपसूचना मुख्यसभेत मंजूर करण्यात आल्या. त्यामुळे भविष्यात शहराच्या आसपासच्या उपनगरांतील प्रवाशांनाही मेट्रोचा लाभ मिळणार आहे. पालिकेच्या एप्रिलमदील सभेत स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग खेड शिवापूर टोलनाक्यापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. नगरसेविका वर्षा तापकीर यांनी हा प्रस्ताव शहर सुधारणा समितीकडे दिला होता. समितीने त्यास मान्यता दिल्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी मुख्यसभेपुढे आला आणि सभागृहाने त्यास मंजुरी दिली. याशिवाय स्वारगेट ते खडकवासला मेट्रो मार्गाचा विस्तार डोणजे चौकापर्यंत करावा, अशी उपसूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते काका चव्हाण आणि नगरसेविका अनिता इंगळे यांनी मांडली. सिंहगड, पानशेत परिसरात शनिवार-रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने या भागासाठी मेट्रोची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कात्रज ते हिंजवडी मेट्रोचा विस्तार उंड्रीपर्यंत करावा, अशी स्वतंत्र उपसूचनाही मांडली. तसेच केंद्राने मंजूर केलेल्या रामवाडी ते वाघोली मेट्रोचा विस्तार लोणीकंदपर्यंत करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा, तसेच उन्नत मार्गाचाही विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. या सर्व उपसूचनांना मुख्यसभेने एकमताने मंजुरी दिली. सध्या पुण्यात मेट्रोचे केवळ दोन मार्ग कार्यान्वित आहेत. इतर मार्ग मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. मेट्रो विस्तार दोन स्वतंत्र नियोजन प्राधिकरणांच्या हद्दीत होणार असल्याने खर्चाचे नियोजन, प्रशासकीय समन्वय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी व्यवहार्यता अहवाल तयार करावा लागेल. त्या अहवालानंतरच मेट्रो विस्ताराचे भवितव्य ठरेल.