Pune : पूरपातळी निश्चितीसाठी उड्डाण पुलांवर मार्किंग

पुणे – खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर, तसेच धरणाच्या पुढील भागातील फ्री कॅचमेंट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे मुठा नदीच्या पाण्याची पातळी नेमकी किती वाढते, हे निश्चित करण्यासाठी खडकवासला धरणापासून संगमवाडीपर्यंतच्या मुठा नदीवरील पुलांच्या खांबांवर मार्किंग करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिले आहेत.
पावसाळा सुरू झाल्यामुळे शहरातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी सर्व संबंधित विभागांची बैठक घेतली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडले असताना धरणाच्या पुढील भागात फ्री कॅचमेंट क्षेत्रातही मोठा पाऊस झाला होता.
यंदाही मुठा नदीत अवघे दोन हजार क्युसेक पाणी सोडूनही शहर व धरणाच्या पुढील भागात झालेल्या पावसामुळे भिडे पुलाला पाणी लागले होते. त्यामुळे पूरस्थितीचा नेमका अंदाज येऊन भविष्यातील उपाययोजनांसाठी हे मार्किंग करण्यात येणार असल्याचे दिवटे यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या हद्दीतील वारजे हायवे, म्हात्रे पूल, एस. एम. जोशी पूल, लकडी पूल, झेड ब्रीज, महर्षी शिंदे पूल, टिळक पूल, नवापूल आणि संगमवाडी पूल अशा प्रमुख पूलांवर हे मार्किंग केले जाणार आहे. याशिवाय या बैठकीत शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, तातडीच्या खोदाईच्या परवानगी, पावसाळ्यात पाणी साठणाऱ्या ठिकाणी करण्यात आलेल्या कामांचा आढावाही घेण्यात आला.
एकतानगरीत पीए सिस्टीम
मागील वर्षी खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने एकतानगरी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी पुराची माहिती नागरिक, तसेच प्रशासनापर्यंत वेळेवर पोहोचली नव्हती. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. वाहनांचेही नुकसान झाले होते. यंदा अशा स्थितीचा पूर्वअंदाज घेता यावा, यासाठी या परिसरात नदीकाठावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
नागरिकांना सूचना देण्यासाठी नागरी सूचना यंत्रणा उभारण्यात येणार असून, त्यासाठी ध्वनिक्षेपक बसवले जातील. त्याद्वारे पाणी सोडल्याची, तसेच इतर पूरविषयक सूचना नागरिकांना दिल्या जातील. एकतानगरीसह पाटील इस्टेट येथेही ही यंत्रणा बसवली जाणार आहे.





