Pune Crime : पुण्यात प्रॉपर्टीच्या वादातून आजोबांनी नातवावर झाडल्या गोळ्या; लोणावळ्यात खळबळ
Pune Crime : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळ्यात अभय मराठे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे.

Pune Crime : पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात अभय मराठे यांच्या मृत्यूच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. सुरुवातीला रायफल साफ करताना अचानक गोळी सुटल्याने अभय मराठे यांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलिस तपासात हा प्रकार अपघाती नसून प्रॉपर्टीच्या वादातून गोळीबार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी 83 वर्षीय मोतीराम मराठे यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)
ही घटना 5 ऑक्टोबर रोजी लोणावळ्यातील भुशी गावातील मोतीराम हॉटेलच्या परिसरात घडली. अभय मराठे यांच्या छातीत परवानाधारक 12 बोअर रायफलची गोळी लागली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. (Pune Crime)
प्रॉपर्टीच्या वादातून गोळीबार झाल्याचा पोलिसांचा दावा
पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासानुसार, अभय मराठे आणि त्यांचे आजोबा मोतीराम मराठे यांच्यात मालमत्तेवरून वाद सुरू होता. 5 ऑक्टोबर रोजीही दोघांमध्ये एका व्यवहारावरून वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचे वृत्त आहे. त्यानंतर मोतीराम मराठे यांनी परवानाधारक रायफलमधून अभय यांच्या दिशेने गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा आहे. (Pune Crime)
अपघाताचा बनाव केल्याचा आरोप
घटनेनंतर रायफल साफ करताना अचानक गोळी सुटल्याचे चित्र निर्माण करण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे. तपासादरम्यान हॉटेलमधील कर्मचारी आणि इतर संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात आली. तसेच घटनास्थळावरील परिस्थिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुढे नेला. (Pune Crime)
याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर काढून लपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणी मोतीराम मराठे यांच्यासह हिरामण मोतीराम मराठे, मनोज हिरामण मराठे, कविता हिरामण मराठे आणि राजश्री दशरथ पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)
या प्रकरणामुळे सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या अभय मराठे यांच्या मृत्यूमागे नेमका काय प्रकार घडला, याचा तपास आता खुनाच्या दिशेने सुरू आहे. पोलिसांकडून घटनास्थळावरील पुरावे, रायफल, सीसीटीव्ही आणि संबंधित व्यक्तींच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास करण्यात येत आहे. (Pune Crime)



