Pune Crime: ‘राज पटेल’ निघाला ‘शहजाद’! पुण्यात बोगस डॉक्टरचा भयंकर कारनामा उघड…राजस्थानातील तरुण ताब्यात
Pune Crime: आधारकार्डवर शहजाद इक्बाल खान तर व्हिजिटिंग कार्डवर 'राज पटेल'; संशय आल्याने महिला पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपी ताब्यात.

Pune Crime- डॉक्टर असल्याचे भासवून नागरिकांवर उपचार करणाऱ्या राजस्थानमधील तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट सहाने ताब्यात घेतले. गुडघेदुखीवर उपचार करण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या गुडघ्यात सुई टोचून तीन वेळा रक्त काढले. हे अशुद्ध रक्त असल्याचे सांगून उपचारापोटी १२ हजार रुपये उकळल्याचा प्रकार फुरसुंगीतील भेकराईनगर परिसरात उघडकीस आला. शहजाद इक्बाल मोहम्मद खान (रा. खटीक मोहल्ला, सांगोद, कोटा, राजस्थान) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
तो ‘राज पटेल’ या नावाने वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी फुरसुंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पाखरे यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एस. पी. इन्फोसिटी परिसरातील रहिवासी सुहास हल्डर यांच्या आई सविता यांच्या गुडघ्यांवर उपचार करण्यासाठी संशयिताने ३ ऑक्टोबरला फोन केला होता.
मी डॉक्टर असून तुमच्या आईच्या गुडघ्यांवर उपचार करतो, असे त्याने सांगितले. मात्र, आईवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने हल्डर यांनी त्याला नकार दिला. त्यानंतरदेखील रविवारी (४ ऑक्टोबर) संबंधित व्यक्ती त्यांच्या घरी गेला. आपण डॉक्टर असल्याचे सांगत त्याने सविता यांच्या दोन्ही गुडघ्यांची तपासणी केली. त्यानंतर एका गुडघ्यात सुई टोचून रक्त काढले. हे रक्त अशुद्ध असल्याचे सांगून त्याने तीन वेळा रक्त काढल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे.
प्रत्येक उपचारासाठी चार हजार रुपये याप्रमाणे १२ हजार रुपये झाल्याचे सांगून त्याने रक्कम स्कॅनरद्वारे पाठविण्यास सांगितले. आणखी दोन ते तीन वेळा उपचार करावा लागेल, त्यानंतर आराम मिळेल, असेही त्याने सांगितले. संशय आल्याने हल्डर यांनी गुन्हे शाखेतील महिला पोलिस हवालदार पल्लवी मोरे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी संशयिताकडे आधारकार्ड व वैद्यकीय ओळखपत्र मागितले असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
तो पळून जाऊ लागल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ‘राज पटेल नॅचरोपॅथी केअर’ नावाचे व्हिजिटिंग कार्ड तसेच विविध औषधे व उपचार साहित्य आढळले. त्याच्याकडे कोणतेही वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे त्याने सांगितले. आपण ‘तुंबडी’ उपचार करीत असल्याचेही त्याने सांगितले.
आधारकार्डवर शहजाद, कार्डवर ‘राज पटेल’
पोलिसांना त्याच्याकडील आधारकार्डवर ‘शहजाद इक्बाल मोहम्मद खान’ असे नाव आढळले, तर व्हिजिटिंग कार्डवर ‘राज पटेल’ असे नाव होते. विचारणा केल्यावर शहजाद हे आपले मूळ नाव असून ‘राज पटेल’ नावाने व्हिजिटिंग कार्ड छापल्याचे त्याने सांगितले.





