Pune Liquor Case : मुख्य आरोपीचा ‘तो’ एक फोन अन् पुण्यात टळले ५० मृत्यू; गोखलेनगर छाप्याचा थरारक खुलासा
Pune Liquor Case : पुणे-पिंपरी चिंचवड हादरवणाऱ्या विषारी दारू प्रकरणात नवा खुलासा; हडपसर आणि फुगेवाडीतील मृत्यूचे सत्र पाहून मुख्य आरोपीनेच रोखली पुढील विक्री.

Pune Liquor Case – शहराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक खुलासा समोर आला आहे. केवळ पैशांच्या हव्यासापोटी निष्पाप नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या आरोपींनी दारूमध्ये अत्यंत घातक ‘मिथेनॉल’ रसायन मिसळल्याचे यापूर्वीच पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, या घटनेत एक धक्कादायक वळण समोर आले असून, मुख्य आरोपीने वेळेत घेतलेल्या एका निर्णयामुळे आणि पोलिसांनी केलेल्या तातडीच्या कारवाईमुळे पुढील अनर्थ टळला आहे; अन्यथा मृतांचा आकडा कित्येक पटीने वाढला असता, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दारू विक्रीतून जास्तीत जास्त नफा आणि उत्पन्न मिळावे, या विकृत मानसिकतेतून मुख्य आरोपी योगेश व्हानकडे याने दारूमध्ये मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असलेले ‘मिथेनॉल’ हे रसायन मिसळले होते.
हे विषारी मिश्रण असलेली दारू हडपसर आणि फुगेवाडी या भागात विक्रीसाठी पाठवण्यात आली. ही विषारी दारू प्यायल्यामुळे एकामागून एक नागरिकांचे आरोग्य बिघडू लागले आणि मृत्यूचे तांडव सुरू झाले. आपल्या कृत्याचे गंभीर परिणाम समोर येत असल्याचे आणि मृत्यूचे सत्र सुरू झाल्याची माहिती मुख्य आरोपी वानखेडे याला मिळाली.
मुख्य आरोपीने विक्री थांबवली!
हडपसर आणि फुगेवाडी येथील मृत्यूच्या वृत्ताने मुख्य आरोपी योगेश व्हानकडे याचे धाबे दणाणले. त्याने याच विषारी दारूचे तब्बल ३५ लीटरचे १२ ड्रम पुढील विक्रीसाठी गोखलेनगर (पुणे) येथील आरोपी धोत्रे याच्याकडे आधीच पाठवले होते. मात्र, विषारी दारूचे परिणाम पाहून वानखेडेने तातडीने धोत्रे याच्याशी संपर्क साधला. “ती दारू अत्यंत घातक आहे, तिची विक्री अजिबात करू नकोस,” अशी सक्त ताकीद वानखेडेने धोत्रेला दिली. वानखेडेच्या या इशाऱ्यामुळे धोत्रेने त्या १२ ड्रममधील दारूची विक्री थांबवली आणि तो साठा तसाच लपवून ठेवला.
५० हून अधिक जणांचे प्राण वाचले!
धोत्रे याच्याकडे असलेला ३५ लिटरचा १२ ड्रमचा साठा प्रचंड मोठा होता. जर ही दारू पुणे, पिंपरी चिंचवड किंवा पुणे ग्रामीण भागात विकली गेली असती, तर किमान ५० हून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले असते. आरोपीने स्वतःच्या बचावासाठी का होईना, पण विक्री थांबवल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
पोलिसांची तत्परता: मृत्यूचा साठा जप्त
घटनेचे गांभीर्य ओळखून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने चक्रावून सुरू केला होता. मुख्य आरोपी योगेश व्हानकडे आणि त्याच्या साथीदारांची कसून चौकशी केली असता, या १२ ड्रमच्या साठ्याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ गोखलेनगर भागात छापा टाकून हा ३५ लिटरच्या १२ ड्रमचा विषारी दारूचा साठा जप्त केला. पोलिसांनी वेळीच हा साठा ताब्यात घेतल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील एक मोठी जीवितहानी टळली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश व्हानकडे याच्यासह इतर आरोपींवर कडक कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना हे घातक मिथेनॉल रसायन कोणी पुरवले? या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, बेकायदेशीर आणि विषारी दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.






