Pune Hooch Tragedy : ‘त्या’ भयानक रसायनाचा पुरवठा ऑनलाईन? सीआयडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर
Pune Hooch Tragedy : पुणे अन् पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ८ आरोपींचा ताबा सीआयडीकडे; विषारी दारूमध्ये वापरलेल्या मिथेनॉलच्या मुख्य स्रोताचा शोध सुरू.

Pune Hooch Tragedy – पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरात घडलेल्या गाजलेल्या विषारी दारूकांड प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) हाती घेतल्यानंतर तपासाला वेग आला आहे. रविवारी सीआयडीने अटक करण्यात आलेल्या आठही आरोपींची पाषाण येथील कार्यालयात कसून चौकशी केली. यामध्ये विषारी दारूमध्ये वापरलेल्या मिथेनॉलच्या स्रोताचा शोध घेण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
या प्रकरणात पुणे शहर आणि पिंपरी- चिंचवड पोलिसांनी आतापर्यंत एकूण आठ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरोधात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शनिवारी रात्री या सर्व आरोपींचा ताबा सीआयडीकडे सोपविण्यात आला. त्यानंतर रविवारी सकाळपासूनच चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
मिथेनॉलचा पुरवठा कसा झाला?
सीआयडीसमोर सध्या सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे दारूमध्ये भेसळ करण्यासाठी वापरण्यात आलेले मिथेनॉल आरोपीपर्यंत कसे पोहोचले. प्राथमिक तपासात आरोपीनी ऑनलाइन माध्यमातून मिथेनॉलची खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हे रसायन कोणत्या कंपनीकडून, कोणत्या नावाने आणि कोणत्या कागदपत्रांच्या आधारे पुरविण्यात आले, याचा तपास सुरू आहे. मिथेनॉल हे अत्यंत घातक रसायन असून, त्याचा मानवी शरीरावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे त्याच्या खरेदी- विक्रीसाठी नियम आणि परवानग्या आवश्यक असतात. अशा परिस्थितीत विनापरवाना मोठ्या प्रमाणावर मिथेनॉल आरोपींकडे कसे पोहोचले, याचा उलगडा करणे सीआयडीसमोरील मोठे आव्हान आहे.
आर्थिक व्यवहारांचाही शोध
तपास यंत्रणा आरोपींचे बँक व्यवहार, मोबाइल कॉल रेकॉर्ड, ऑनलाइन खरेदीच्या नोंदींची, तसेच दारू विक्रीच्या नेटवर्कची माहिती गोळा करत आहे. या प्रकरणामागे आणखी काही व्यक्ती किंवा मोठे रॅकेट कार्यरत होते का, याचाही तपास केला जात आहे.
एक्साइजचा तपासही सीआयडीकडे?
दरम्यान, पोलिसांकडील तपास हाती घेतल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून (एक्साइज) सुरू असलेला तपासही सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी सीआयडीने राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही तपास एकाच यंत्रणेकडे आल्यास संपूर्ण साखळीचा तपास अधिक प्रभावीपणे करता येईल, असे सीआयडीचे म्हणणे आहे.





