Pune: फुल बाजारात ३४ वर्षांपासून मीटरविनाच लाईट

विजयकुमार कुलकर्णी
पुणे – मार्केट यार्डातील फुल बाजारातील व्यापाऱ्यांना लाईट मीटरसाठी तब्बल ३४ वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. गाळ्यावर वापरासाठी लाईट आहे. मात्र, मीटर विनाच लाईट आहे. बाजार समिती प्रशासनाकडून सध्या दुपारी दोन वाजता सरसकट लाईट बंद करण्यात येते. माल संपो अथवा न संपो लाईट बंद होते. त्यामुळे व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला स्वतंत्र्य मीटर देण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
मार्केट यार्डात १९९० मध्ये फुल बाजार सुरू झाला. तेथे १०० ते ११० गाळेधारक आहेत. त्यांना अद्याप मीटर देण्यात आलेले नाहीत. त्यावरून वापरली जाणारा बल्ब, मर्क्युरी आणि इलेक्ट्रीक काट्यावर प्रती व्हॅट ५ रुपये बील आकारले जाते. शेजारी फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग आहेत. तेथे मात्र सर्वांना स्वतंत्र्य मीटर आहेत. हे सर्व विभाग बाजार समितीचेच आहेत. फुल बाजारातून ही सेस भरला जातो. याउलट फुल बाजारात तर इतर विभागापेक्षा अतिरिक्त जागा भाडेही आकारले जाते.
तरीही केवळ फुल बाजारावरच का अन्याय, असा प्रश्न आता फुल व्यापाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. सर्वांना समान न्याय, तत्त्वानुसार आम्हालाही लाईट मीटर मिळाला पाहिजे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यासाठी व्यापाऱ्यांकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे. पेट्रोल पंपची लाईटही याच कनेक्शनवर आहे. व्यापाऱ्यांकडून कमी लाईट बिल येते, असे बाजार समिती प्रशासनाला वाटते. मीटर दिल्यास प्रत्येक जण जेवढी लाईट वापरेल, तेवढीच बिल भरेल. त्यामुळे वीज मीटर देण्याची मागणी करण्यात येत आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेणार, हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे.
“फुल बाजारातील व्यापाऱ्यांना स्वंतत्र्य मीटर द्यावा. त्यासाठी येणारा खर्च करण्यास तयार आहोत. व्यक्ती अथवा गाळ्याच्या नावावर मीटर दिला तरी चालेल. नावावर मीटर दिला म्हणून भविष्यात कोणतेही हक्क सांगणार नाही, असे प्रतिज्ञापत्र करून देण्यासही तयार आहोत.” – अरूण वीर, अध्यक्ष, अखिल पुणे फुलबाजार आडते असोसिएशन
“कायदेशीर अडचणीमुळे फुल बाजारातील व्यापाऱ्यांना मीटर देता आलेला नाही. मात्र, फुल बाजार आता लवकरच नवीन जागेत स्थलांतर होणार आहे. प्रशासनाच्या वतीने तेथे सर्व व्यापाऱ्यांना सबमीटर दिले जातील.” – दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.





