Pune: ‘ड्रंक अॅंड ड्राइव्ह’ करणाऱ्यांचे परवाने रद्द?

पुणे – कल्याणीनगर परिसरात एबीसी फार्म येथे काही दिवसांपूर्वी उद्योगपतीच्या ऑडी कारने धडक दिली. यामध्ये एका फुड डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल घेत वाहतूक पोलिसांनी “ड्रंक अॅंड ड्राइव्ह’ मोहीम राबवत आतापर्यंत एक हजार मद्यपींवर कारवाई केली आहे.
यातील दोनशे जणांचे परवाने रद्द करण्याचे पत्र आरटीओ कार्यालयाला दिलेले आहे. उर्वरित ८०० जणांचे परवाने रद्द करण्याचे पत्रही देण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी “ड्रंक अॅंड ड्राइव्ह’ची कारवाई नियमित सुरू केली आहे. यासाठी २७ फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. तर सव्वाशे अधिकारी आणि कर्मचारी कारवाईसाठी नेमले आहेत. सोबतच “ब्रेथ ॲनालाइजर’साठी डिस्पोजेबल पाइप वापरण्यात येणार आहेत.
दरम्यान, मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या हजार जणांवर घटनास्थळी दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. मद्यपी वाहन चालकांना जरब बसावी, तसेच मद्यप्राशन करून कोणी वाहन चालवू नये, म्हणून कडक कारवाई करण्याचे वाहतूक विभागाने ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून परवाने रद्द करण्यासाठी आरटीओला पत्र देण्यात आले आहे.
तर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सांगितले, आम्ही कायद्यानुसार तीन ते सहा महिन्यांसाठी परवाना रद्द करतो. वाहतूक शाखेच्या पत्रानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. परवाना रद्द झाल्यानंतर आम्ही वाहन चालकांना बोलावून घेतो. त्यांना वाहतुकीचे नियम समजावून सांगतो. तसेच त्यांचे समुपदेशन करतो. यानंतर त्यांना रद्द झालेला परवाना कारवाईची मुदत संपल्यावर परत देतो.’
परवाने रद्द करण्याचा अधिकार आरटीओला आहे. त्यामुळे त्यांना पत्र देण्यात आले आहे. मद्यपी वाहनचालकांवरील ही कारवाई नियमित सुरू राहणार आहे. यामुळे नागरिकांनी मद्यपान करून वाहने चालवू नये, अन्यथा त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल.’ – मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त.





