Pune : काळा कोट न घालता वकिलांना चार महिने करता येणार काम

पुणे : काळा रंग सूर्यप्रकाश शोषून घेत असल्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे वापरणे शक्यतो टाळले जाते. न्यायालयात पक्षकारांची बाजू मांडणारे वकील मात्र याला अपवाद ठरतात.
आपल्या पेशाची ओळख सांभाळण्यासाठी दिवसभर त्यांना काळ्या कोटातच वावरावे लागते. तरीही वकिलांना उन्हाळ्यात काळात कोटाचा त्रास होऊ नये, यासाठी दरवर्षी १५ मार्च ते ३० जून या तीन महिन्याच्या कालावधीत काळा कोट न वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.
मात्र, यंदा उन्हाच्या वाढत्या झळांमुळे १५ दिवस आधीच दि. १ मार्चपासून ही मूभा देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सिव्हिल मॅन्युअलच्या प्रकरण २२ मधील परिच्छेद ६३६ नुसार वकिलांना कोट वापरास सूट देण्यात आली आहे. त्यानुसार, येत्या दि. ३० जूनपर्यंत न्यायालयीने कामकाजात काळ्या कोटचा वापर ऐच्छिक असणार आहे.
कोटशिवाय वकिली कल्पनाही करू वाटत नाही. कोट घातल्यावरच वकील परिपूर्ण वाटतो. त्यामुळे उन्हाळ्यातही वकील कोट घालण्यास प्राधान्य देतात. मात्र, तापमान जास्त असलेल्या, वीज पुरवठा खंडीत होणाऱ्या अथवा सोयी, सुविधा नसलेल्या ग्रामीण भागातील वकिलांना या निर्णयाचा फायदा होतो
– अॅड. अभिषेक हरगणे, फौजदारी वकीलमार्च महिना सुरू होताच उन्हाचा चटका बसण्यास सुरुवात होते. त्यामुळे, न्यायालयीन कामकाज करताना मोठ्या प्रमाणावर उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. कामकाजावेळी प्रत्येक वेळी कोट घालणे त्रासदायकही ठरते. त्यामुळे दि. ३० जूनपर्यंतचे काळ्या कोटचे बंधन नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, असे असले तरीही बहुतांश वकील शक्य तेवढा कोटचा वापर करण्यास प्राधान्य देतात.
– अॅड. गणेश माने, कार्यकारिणी सदस्य, पुणे बार असोसिशन




