Pune : लेटलतिफ कर्मचारी महापालिकेच्या रडारवर; आयुक्तांचे कडक पाऊल

पुणे – काम सोडून कार्यालयाबाहेर बाहेर फिरणाऱ्या आणि ‘आओ जावो, घर तुम्हारा,’ अशा पद्धतीने काम करणाऱ्या लेट लतिफ कर्मचाऱ्यांना जरब बसणार आहे. पालिकेच्या कार्यालयासह, क्षेत्रीय कार्यालयांत कर्मचारी कामाची वेळ पाळत नसल्याची बाब दैनिक प्रभातने समोर आणली होती. त्याची दखल घेत आयुक्त नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत.
पालिकेतील काही अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळांचे काटेकोरपणे पालन करत नाहीत. त्यामुळे आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना याचा अहवाल देण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये दैनंदिन कार्यालयाबाहेर जाणारे कर्मचारी, वेळेत उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तपशील देण्यास बजावले आहे. दररोज सायंकाळी खातेनिहाय, संवर्गासह हा अहवाल आयुक्तांकडे सादर करावा लागणार आहे.
पालिकेत पाच दिवसांचा आठवडा आहे. त्यानुसार कार्यालयीन वेळा ठरवल्या असून, फिरतीच्या, क्षेत्रीय व शिफ्टमधील कर्मचाऱ्यांचे वेळापत्रकही निश्चित केले आहे. अनेक कर्मचाऱ्यांची कामावर उपस्थित राहण्याची वेळ सकाळी ९.३० आणि ९.४५ आहे. दुपारी जेवणाची वेळ २ ते २.३० असून, घरी जाण्याची वेळ सायंकाळी ६ ते ६.१५ पर्यंत आहे.
मात्र, अनेकजण सकाळी ११ नंतर कार्यालयात येतात आणि जेवणासाठी दुपारी दीड वाजताच बाहेर पडून तीन वाजता येतात. संध्याकाळी बाहेर पडण्यासाठी साडेपाच वाजताच काम बंद करतात. या बेशिस्तीमुळे प्रशासकीय कामे होत नाहीत, तसेच कामांसाठी आलेल्या नागरिकांनाही ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे आयुक्तांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
प्रशासकीय कारवाईचा बडगा
पालकेचे अनेक अधिकारी, कर्मचारी कामाच्या जागी भेट देण्यासाठी बाहेर जातात. अनेक जण पाहणीच्या नावाखाली गायब असतात. हे लक्षात घेऊन कामासाठी बाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अहवाला विभागप्रमुखांना सादर करावा लागणार आहे. लेटलतिफ कर्मचाऱ्यांना समज दिल्यानंतरही ते ऐकत नसतील, तर थेट प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.





