पुणे : ‘लक्ष्मी’ रस्त्याला झळाळी ; पाडवा मुहूर्तांवर बाजारात कोट्यवधींची उलाढाल

पुणे – साडेतीन मुहुर्तातील पाडवा मुहूर्तांवर सराफ बाजारात चांगली गर्दी होती. यावर्षी सोन्याच्या तयार दागिन्यांना मागणी चांगली होती यातून मोठी उलाढाल झाली.
काही ठिकाणी खरेदीवर सवलत योजना असल्याने उलाढाल वाढली असल्याचे सराफ व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. परंपरागत दागिने खरेदीकडे नागरिकांचा कल होता. आज, 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमला 56 हजार 587 रुपये, 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 61 हजार 776 एवढा होता तर चांदीचा दर 72 हजार 364 रुपये प्रति किलो होता.

पाडवा, भाऊबीज उत्साहात साजरी
पुणे – ‘प्रकाशाची करुनिया उजळण दीपावली ही आली, लक्षलक्ष दिव्यांचा झगमगीत साज ही ल्याली’, अशी प्रकाशाची उधळण करणारी दिवाळी घरोघरी आनंदाने साजरी करण्यात आली. दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज हे शेवटचे दोन दिवस घरोघरी नात्यांची गुंफण आणि गेट टुगेदर याने पार पडले.
दिवाळी पाडवा मंगळवारी (दि.14) साजरा करण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याला घरोघरी विधिवत पद्धतीने पूजाअर्चा करण्यात आली. पाडव्याला व्यापाऱ्यांचे नवीन वर्ष सुरू होते. यानिमित्त वहीपूजन आणि दुकानात पूजा करून त्यांनी हिशोबाच्या नवीन वर्षाचा प्रारंभ केला.
पाडवा यादिवशी सुवासिनींकडून पतीचे औक्षण करण्यात आले. रांगोळीने बळीराजाची प्रतिमा काढून तिचे पूजन केले. “इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना केली. बहीण-भावाच्या नात्याची वीण अधिक घट्ट करणारा दिवस म्हणजे भाऊबीज! बुधवारी (दि.15) साजरी करण्यात आली.





