Pune : कोयता गॅंगचा आरोपी जेरबंद… आंबेगावातील घटनेनंतर रुग्णवाहिकेतून बीडला पलायन

पुणे – आंबेगाव परिसरात कोयत्याने दहशत माजवण्याऱ्या मुख्य आरोपीच्या मुसक्या भारती विद्यापीठ पोलिसांनी बीड येथून आवळल्या. घटनेनंतर आरोपी ससून येथून एका रुग्णवाहिकेतून बीडला गेला होता. तेथे तो ग्रामपंचायत सदस्य असलेल्या मामाच्या घरी लपून बसला होता.
करण अर्जुन दळवी (वय 21 रा. माणिकबाग, सिंहगड रोड) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर सिंहगड रोड आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. तो बीड येथे एका महाविद्यालयात 12 वी विज्ञान शाखेत आहे. मागील महिन्यापासून तो महाविद्यालयात गेला नाही. पुण्यात तो आईजवळ राहात होता.
सिंहगड महाविद्यालयाच्या आंबेगाव कॅम्पसमध्ये 28 तारखेला रात्री करण दळवी आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराने कोयता घेऊन धुमाकुळ घातला होता. त्याच्या साथीदाराने रस्त्याने जाता जाता वाहनांची तोडफोड करण्याबरोबरच कोयत्याने तिघांवर वार केले होते. यामध्ये अथर्व लाडके (वय 20, रा. सिंहगड व्हॅली आंबेगाव बु.) याच्या पाठीवर कोयत्याने वार केले होते. तर त्याच्या मित्राला प्लॅस्टीकचा स्टुल फेकून मारला होता. दोघांनी दहशत माजवण्याच्या इराद्याने कोयता हातात फिरवून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना धाक दाखवून दुकानांच्या शटरवरही हल्ला केला. यावेळी घटनास्थळी आलेल्या दोघा मार्शलनी धाडस दाखवत अल्पवयीन गुन्हेगाराला कोयत्यासह ताब्यात घेतले होते. मात्र करण दळवी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला.
पळ काढल्यावर दळवीने प्रथम एका मित्राच्या घरी आसरा घेतला. यानंतर गावाला फोन करुन बीडवरुन कोणी पुण्यात येणार आहे का, याची माहिती घेतली. एका रुग्णाला घेऊन एक रुग्णवाहिका बीडमधून ससून रुग्णालयात येणार होती. याची माहिती मिळताच तो ससून रुग्णालयात गेला. तेथून रुग्णवाहिकेत बसून तो बीडला गेला. बीडला त्याचा मामा ग्रामपंचायत सदस्य आहे. त्याच्या घरी त्याने आसरा घेतला. दरम्यान, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे यांना आरोपी बीड येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक मध्यरात्री अडीचच्या सुमारास बीडला पोहचले. त्याला झोपेत असतानाच मामाच्या घरातून ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, शैलेश साठे, सचिन सरपाले, चेतन गोरे, मंगेश पवार, नीलेश ढमढेरे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, नीलेश खैरमोडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, राहुल तांबे यांच्या पथकाने केली.
व्हायरल व्हिडिओमुळे जीवाची भीती
दरम्यान, घटनेची व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. ही क्लिप पाहिल्यावर आरोपीने घाबरुन त्याचा मोबाइल व इतरांशी संपर्क बंद केला होता. आपल्या साथीदाराला बेदम मारले आहे, आता आपले काही खरे नाही, अशी भीती त्याला होती.




