पुणे किडनी तस्करी प्रकरण : ससूनच्या विभागीय किडनी मान्यता समितीची चौकशी अजूनही सुरूच

पुणे- खासगी रुग्णालयातील किडनी तस्करी प्रकरणात ससून रुग्णालयातील विभागीय किडनी मान्यता समितीची अद्यापही कसून चौकशी सुरू आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त वीरेंद्र सिंग यांच्या समितीच्या सदस्यांनी सोमवारी ही चौकशी केली आहे.
खासगी रुग्णालयात ज्यांना किडनी प्रत्यारोपण करायचे आहे, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि आर्थिक देवाण-घेवाण, तस्करी, फसवणूक होत नाही ना याची खात्री करण्याची जबाबदारी विभागीय समितीवर असते. पुण्यातील या समितीमध्ये ससून रुग्णालयाचे अधीक्षक, शल्यचिकित्सा, मेडिसिन विभागातील प्राध्यापक, आरोग्य सहायक संचालक यांचा समावेश असतो. असे असतानाही कोल्हापूरमधील महिलेची फसवणूक झाली, तसेच या प्रकरणात बनावट कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
गेल्या आठवड्यात वीरेंद्र सिंग हे ससून रुग्णालयात आले होते, त्याचवेळी किडनी रॅकेट प्रकरणात राज्याच्या आरोग्य विभागाने गठीत केलेली समिती तेथे चौकशी करत होती. मात्र त्याची माहिती सिंग यांना देण्यात आली नाही. सिंग यांनी रुग्णालयातील प्रकल्पांची पाहणी केली. आता सिंग हे चौकशी करताना त्यांना ही बाब समजली आणि त्यांच्या रोषाला ससून प्रशासनाला सामोरे जावे लागले.





