पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला ६६८ पाण्याचा विसर्ग शनिवारी सायंकाळी ६:०० वाजता बंद करण्यात आला. मागील आठवड्यात पाऊस वाढल्याने तीन हजार क्यूसेकने हा विसर्ग सुरू करण्यात आला होता. दरम्यान, पानशेत, वरसगाव, टेमघर अणि खडकवासला धरणाचा एकूण पाणीसाठा २२.८९ टीएमसी झाला आहे. हा पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत साडेदहा टीएमसी अधिक आहे. पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिवसभरात खडकवासला धरणात दोन मि.मी. पावसाची नोंद झाली. तर, पानशेत आणि वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुन्य मि.मी.पाऊस झाला. तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अवघ्या ५ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणात येणारे पाण्याचे प्रमाण कमी झाले असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. तर खडकवासला धरणा पाठोपाठ आता पानशेत आणि वरसगाव ही दोन्ही मोठी धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत. धरणसाठा सद्यस्थिती खडकवासला : ५६ टक्के पानशेत : ७९ टक्के वरसगाव : ८३ टक्के टेमघर : ७४ टक्के