Pune: कात्रज-कोंढवा मार्गाचे काम संथ, असुरक्षित

कोंढवा – कात्रज – कोंढवा मार्गाचे काम सध्या अतिशय संथ आणि असुरक्षित सुरू आहे. त्यामुळे हा मार्ग धोकादायक झाला आहे. जागोजागी खोदकाम सुरू आहे. शनिवारी येथे खड्ड्यात चार मुली पडल्या. त्यातील एका मुलीचा मृत्यू झाला. अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा आणखी तीव्र जनआंदोलन छेडू असा इशारा पश्चिम महाराष्ट्र भाजप अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी रविवारी दिला.
कोंढवा बुद्रुक पोलीस स्टेशन, शूरवीर येसाजी कामठे चौक, दशरथ मरळ चौक, पुण्यधाम आश्रम रोड, खडीमशीन चौक, श्रीकुंज सोसायटीजवळ, काकडे वस्ती तसेच येवलेवाडी येथील प्रमुख रस्त्यांवर मनपातर्फे खोदकाम करण्यात आले आहे. त्या विरोधात कोंढवा बुद्रुक व येवलेवाडी ग्रामस्थांच्या वतीने जालिंदर कामठे व माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वात रविवारी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले.
कोंढवा बुद्रुक तसेच येवलेवाडी येथे सर्वच बाजूने खोदकाम सुरू असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. याचा त्रास ग्रामस्थांना होत आहे, अशी तक्रार आंदोलकांनी केली. या प्रसंगी गणेश कामठे, भरत धर्मावत, संगीता ठोसर, भारती कामठे, गंगाधर बधे, बजरंग वाघ, सुखदेव लोणकर, वसंतराव कामठे, मधुकर मरळ, शिरीश धर्मावत, शिवाजी मरळ, माऊली कामठे, शिवाजी बधे, हभप सुनील महाराज कामठे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.





