Pune: कात्रज उड्डाणपूल काम रेंगाळत सुरू

कात्रज – कात्रज उड्डाणपूलाच्या कामाचे उद्घाटन दि. 24 सप्टेंबर 2021 मध्ये झाले. या पुलाचे काम पूर्ण करण्याची मुदत दि. 24 फेब्रुवारी 2024 पर्यंत होती. त्यानंतर या कामाला मुदतवाढ देण्यात आली असली तरी वेगवेगळ्या कारणातून पुलाचे काम रेंगाळत सुरू आहे. यातून होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिक त्रस्त आहेत. हे काम कधी पूर्ण होणार याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडूनही कानावर हात ठेवले जात आहेत.
नवले पुलाकडून कोंढव्याकडे जाणारी वाहतूक कात्रज चौकात न येता ती थेट वंडरसिटी येथून उड्डाणपूलावरून राजस सोसायटीपुढे जाणार आहे. चौकातील वाहूतक पुलावरून गेल्यास पीएमपी बसथांबा किंवा कात्रज मंडई परिसरात तसेच सातारा रस्त्यावर आणि वंडरसिटीच्या बाजूने होणारी कोंडी कमी होणार आहे. कात्रज चौकातील व राजस चौकातील वाहतूकीचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.
राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून जाणाऱ्या या पुलासाठी केंद्र सरकारचा 169.15 कोटी रुपयांचा निधी असला तरी सहापदरी 1 हजार 326 मीटर लांबीचा पुल वेळेत पूर्ण करणे हे राष्ट्रीय महामार्ग विभागापुढे आव्हान असणार आहे. पुलाचे काम वेळेत पूर्ण व्हावे आणि परिसरातील नागरिकांना होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे.
पाइंटर चौकट
– उद्घाटन दि. 24 सप्टेंबर 2021
– कार्यारंभ – 25 फेब्रुवारी 2022
– कामाची मुदत होती – 24 महिने
– काम पूर्णची दिनांक होती – 24 फेब्रुवारी 2024





