पुणे : काळेपडळचा पाणी प्रश्न सुटणार; लवकरच मिळणार मुबलक पाणी

हडपसर – सेलेना पार्क येथील पाणी साठवणूक टाकी आणि पाण्याच्या नवीन लाईन यांचे काम अंतिम टप्प्यात असून ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस काळेपडळ, हांडेवाडी रोड परिसरातील नागरिकांना मुबलक व पुरेशे पाणी मिळेल, अशी माहिती नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली.
प्रभाग क्रमांक २६ महंमदवाडी – कौसरबाग मधील काळेपडळ, चिंतामणीनगर, सातवनगर, हांडेवाडी रोड मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावत होता. तेव्हा नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक लहान मोठी आंदोलने नागरिकांनी क्षेत्रिय कार्यालय, लष्कर पाणीपुरवठा जलकेंद्र, महापालिका मुख्य इमारत आणि आयुक्तांच्या दालनात केली.त्यास आता यश येताना दिसत आहे. सन २०१५ साली अखेरीस सलोनी पार्क, कळेपडळ येथे २५ दशलक्ष लिटर पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम सुरु झाले.
टाकीचे काम सुरु होऊन काहीच दिवस उलटले होते त्यावेळी टाकीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला पुणे महापालिकेच्या काळ्या यादीत समावेश करण्यात आला. त्या कालावधीत जवळ जवळ दिड ते दोन वर्षे टाकीचे बांधकाम जैसे थे पडून राहिले. त्यानतंर स्थायी समिती सदस्य असताना स्थायीच्या बैठकीत सदस्य भानगिरे यांनी वेळोवेळी आवाज उठवला.
तसेच वरिष्ठांशी बैठका घेतल्या, मुख्य सभेत वेळोवेळी रखडलेल्या टाकीचे काम पूर्ण का होत नाही? असा सवाल करीत प्रशासनाला धारेवर धरले. एवढे केल्यानंतर टाकीचे काम आता ७० टक्के पुर्णत्वास आले होते, परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यातच टाकीचे काम पुन्हा थांबले. याशिवाय निधीही उपलब्ध होण्यास अडचणी आल्या.असे असताना नगरसेवक नाना भानगिरे यांनी पुन्हा सलोनी पार्क येथील पिण्याच्या पाण्याचे टाकीचे राखडलेले काम पूर्ण करण्याचा चंग बांधला व कामास नव्याने सुरुवात केली.
त्याच अनुषंगाने महापालिका आयुक्त, गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या समवेत शिवसेनेच्या नगरसेविका प्राची आल्हाट व नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी प्रभागातील पाणी प्रश्न लावून धरला. त्याचीच दखल घेत टाकीच्या अंतिम टप्प्यातील बांधकामाला सध्या सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस प्रत्यक्ष टाकीतून पाणी मिळण्यास सुरुवात होइल असे नियोजन करण्यात यावे, असेही भानगिरे यांनी महापालिका प्रशासनाला सुचवले आहे.
“गेली अनेक वर्ष या भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ही टंचाई दूर करण्यासाठी सेलेना पार्क येथील पाण्याची टाकी पूर्ण झाली असून पाण्याच्या लाईनचे कामही पूर्ण झाले आहे.नागरिकांना लवकरच या टाकीतून पाणी मिळेल.”
– प्रमोदनाना भानगिरे (नगरसेवक)





