Pune : कनिष्ठ अभियंता भरतीला गती

पुणे – महापालिकेच्या स्थापत्य शाखेतील कनिष्ठ अभियंता (वर्ग ३) पदांच्या भरतीला अखेर गती मिळाली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे रखडलेल्या या भरतीसंदर्भात शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाले असून, आता ११३ ऐवजी १६९ पदांसाठी सुधारित जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
याशिवाय ९ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीस प्रतिसाद देणाऱ्या २७,८७९ उमेदवारांपैकी वयोमर्यादा उलटलेल्या उमेदवारांनाही अर्जाची संधी देण्यात येणार आहे. महापालिकेने जानेवारी २०२४ मध्ये ११३ पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, त्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला.
शासनाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) साठी आरक्षण लागू करण्याचे निर्देश दिल्याने भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. महापालिकेने यावर नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन मागवले होते. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून बिंदुनामावली तपासल्यानंतर सध्या एकूण १७१ पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले.
मात्र, यापैकी दोन पदे लाड- पागे समितीच्या शिफारसीनुसार भरलेली असल्यामुळे प्रत्यक्ष भरतीसाठी १६९ पदांवर प्रक्रिया होणार आहे. विधी विभागाने यावर हरकत नसल्याचा अभिप्राय दिला आहे. दरम्यान, पूर्वी अर्ज केलेल्या २७,८७९ उमेदवारांमध्ये अनेक उमेदवारांचा वयाचा कालावधी आता उलटला आहे.
मात्र, महापालिकेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने वयोमर्यादा सवलतीचा निर्णय घेतला आहे. यामुळे पूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांचे अर्ज वैध मानले जाणार असून, त्यांना प्रवर्ग सुधारणा करण्याची संधीही दिली जाणार आहे.
ही सुधारित भरती प्रक्रिया आयबीपीएस संस्थेमार्फत राबविण्यात येणार असून, यासंदर्भातील प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. याआधी महापालिकेने पहिल्या टप्प्यात ४४८ आणि दुसऱ्या टप्प्यात ३२० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. आता सुरू होणारी तिसऱ्या टप्प्यातील भरती ही स्थापत्य शाखेतील कनिष्ठ अभियंता पदांसाठी असणार आहे.




