Pune : सय्यदनगरमध्ये टिपू पठाणच्या अनधिकृत बांधकामावर पोलिस व महापालिकेची संयुक्त कारवाई

पुणे – कुख्यात गुन्हेगार रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण (रा. सय्यदनगर, हडपसर) याने उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर आज काळेपडळ पोलिस स्टेशन व पुणे महानगरपालिका प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई केली.
काळेपडळ पोलिस स्टेशनमध्ये गु. र. नं. १००/२०२५ या गुन्ह्यांतर्गत त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ३०८(२), ३२९(३), ३५१(२), ३५२, १८९(१), १८९(२), १९१(२) तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) १९९९ चे कलम ३(१)(क्ष्क्ष्), ३(२), ३(४), २३(१) अन्वये गुन्हा दाखल आहे. या पार्श्वभूमीवर टिपू पठाणच्या बेकायदेशीर व्यवसायांवर आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यदनगर परिसरातील हे बांधकाम नियमबाह्य असून, त्याचा वापर स्थानिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी केला जात होता. त्यामुळे पोलिस व महापालिका प्रशासनाने मिळून आज सकाळी पथके रवाना करून संपूर्ण बांधकामावर निष्कासन (demolition) मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईदरम्यान परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून, अवैध मार्गाने उभारलेल्या रचनेवर कायदेशीर पद्धतीने हातोडा पडला आहे.





