पुणे : बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध गोयल गंगा परिवारचे संस्थापक जयप्रकाश सीमाराम गोयल यांचे मंगळवारी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. डाॅ. अतुल गोयल आणि अमित गोयल हे त्यांचे पुत्र होत. बुधवारी (२ एप्रिल) वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गोयल यांनी १५ ऑगस्ट १९८३ रोजी गोयल गंगा परिवारची स्थापना केली. बांधकाम क्षेत्रात कार्यरत या उद्योगाने पुणे, मुंबई, नागपूर आणि बंगळुरू येथे निवासी, व्यावसायिक, शैक्षणिक अशा शंभराहून अधिक प्रकल्पांची यशस्वी निर्मिती केली आहे. दहा हजारांहून अधिक बांधकाम कामगारांना आणि त्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण, आरोग्य तपासणी या सुविधा दिल्या. संस्कारक्षम शिक्षणातून भावी पिढी घडावी, या उद्देशातून त्यांनी २००७ मध्ये गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून त्यांनी गोयल गंगा फाउंडेशन स्थापन केले. या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.