Pune : मंतरवाडी-कोंढवा मार्गाची झाली नदी

कोंढवा– मान्सुनची दमदार सुरूवात होत असताना मुसळधार पावसाने मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण मार्ग व सासवड मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचून या रस्त्यांना नदीचे स्वरुप आले. वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
संध्याकाळी पाच-साडेपाच वाजल्यापासून वडकी, फुरसुंगी, उरुळी देवाची, हांडेवाडी, होळकरवाडी, उंड्री, पिसोळी, वडाचीवाडी, कोंढवा उपनगरांत जोरदार पाऊस झाला. संध्याकाळी ढग दाटून आले. त्यानंतर झालेल्या पावसाने या भागाला चांगलेच झोडपले. पावसानंतर मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पाणी साचले. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, गैरसोय झाली.
हांडेवाडी, मंतरवाडी, कोंढवा आदी भागात मुख्य रस्त्यांसह अनेक ठिकाणी पाणी साचले होते. शाळकरी मुले, दुचाकीवरील महिला, पादचारी यांना पाण्यातून वाट काढत ये-जा करावी लागली. साचलेल्या पाण्यात खड्डा तयार झाल्याने दुचाकीवरील महिलांची मोठी तारांबळ झाली. मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर हांडेवाडी येथे एचपी पेट्रोलपंपासमोर रस्त्यावर तीन फुट पाणी साचल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरुप आले होते.
पादचारी व दुचाकीचालकांना तर या रस्त्यावरून जाणेही धोकादायक झाले तरी संबंधित प्रशासनाने तातडीने याची दखल घेवून याठिकाणी साचणारे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा उरुळी देवाचीचे माजी सरपंच उल्हास शेवाळे व हांडेवाडीचे माजी उपसरपंच अशोक न्हावले यांनी दिला आहे. पहिल्याच पावसात जागोजागी पाणी साचल्याने पालिका व संबंधित प्रशासनाचे सर्व दावे फोल ठरल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.





