पुणे : मोदी सरकारमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील

पुणे –मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला जे वचन दिले त्याची पूर्तता ते करतील अशी अपेक्षा होती. परंतु त्यांनी ते पूर्ण केले नसून, उलट सर्वसामान्यांचे जगणे या सरकारने मुश्कील केले आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
लोंढे यांनी संभाजी उद्यानाजवळ रस्त्याच्या कडेलाच पत्रकार परिषद घेतली. सामान्य माणसांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न असल्याने येथे पत्रकार परिषद घेतल्याचे ते म्हणाले. यावेळी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, महापालिकेतील गटनेते आबा बागूल, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, अरविंद शिंदे, संजय बालगुडे, गोपाळ तिवारी, पूजा आनंद, सुजाता शेट्टी, रफिक शेख, वैशाली मराठे, रमेश अय्यर, संगीता तिवारी, रजनी त्रिभुवन आदी यावेळी उपस्थित होते.
केंद्र सरकारने कायमच स्वत:च्या चुकांचे खापर दुसऱ्यावर फोडले आहे. गेल्या 8 वर्षांत जीवनावश्यक गोष्टींसह अनेक गोष्टींची 100 टक्के भाववाढ झाली आहे. ही जनतेची फसवणूक असल्याची टीकाही लोंढे यांनी केली. गव्हाचा साठा संपत चालला आहे. उज्ज्वला गॅस योजनेत सरकारने फसवणूक केली आहे. महिलांनी दुसऱ्यांदा त्याचा लाभ घेतलाच नाही. स्वयंपाकाच्या गॅसवर राज्य सरकार कर लावत नाही आणि केंद्र सरकारने सबसिडीही बंद केली. त्यातही घोळ केला आहे, असा आरोप लोंढे यांनी केला.
गुजरातला एक हजार कोटी रुपये अनुदान दिले आणि महाराष्ट्राला काहीच नाही. केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारबरोबर बदमाशी करत आहे, असा आरोपही लोंढे यांनी केला. जगणे मुश्कील करणारी महागाई आहे, मंदिर-मस्जिद करून पोट भरणार नाही. गेल्या 70 वर्षांपासून आम्ही एकोप्याने राहिलो आहोत, आम्ही जात, भाषा, प्रांत यावरून कधीच राजकारण केले नाही. विकास हाच आमचा उद्देश्य राहिला आहे. मात्र आता जातीय तेढ निर्माण केली जात आहे, असा आरोपही लोंढे यांनी केला.





