Pune : भुसार बाजारात अनधिकृत बांधकामांना अभय ?

पुणे – मार्केट यार्डातील भुसार विभागात अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या नोटीस १० जणांना देण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात अनेक अनधिकृत बांधकामे आहेत. ही कारवाई दिखाव्यापुरतीच असून अनेकांना बाजार समितीने अभय दिल्याची चर्चा बाजारात रंगली आहे. त्यामुळे बाजार समिती इतर अनाधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करणार का, त्यांनाही नोटीस बजावणार, हे पाहणौ ओत्सुक्याचे ठरणार आहे.
पंचवीस महिन्यांपूर्वी निवडणूक होऊन संचालक मंडळ अस्तित्वात आले. त्यानंतर बाजारात अनधिकृत बांधकामांना पेव फुटले अखेर हा प्रश्न विधी मंडळात पोहोचला. पणनमंत्री जयकुमार रावल यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची घोषणा केली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने मंगळवारी (दि. १५) अनधिकृत बांधकाम करणाऱ्या १० भुखंडधारकांना नोटीस दिल्या. या नोटीस ठराविक व्यापाऱ्यांनाच दिल्या आहेत. त्यामुळे पणनमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचा वापर बाजार समिती प्रशासनाकडून सोयीस्कररित्या केला जात आहे.
‘मार्केट यार्डात सुरू असणारी अनधिकृत बांधकामे, गैरव्यवहार यांना आळा घालण्यासाठी चौकशी लावण्यात आली आहे. यामध्ये प्रशासनाने आणि संचालक मंडळाने कोणालाही पाठीशी घालू नये. पारदर्शक कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू’ – विकास लवांडे, प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प.)
‘बाजार समिती प्रशासनाने १० जणांना नोटीस दिल्या आहेत. यापूर्वी अंतर्गत बदल केल्यामुळे ३० जणांना नोटीस दिल्या आहेत. बाजारात आणखी काही अनाधिकृत बांधकामे आहेत का, याची पाहणी करून पुढील कारवाई करण्यात येईल.’ – डॉ. राजाराम धोंडकर, सचिव पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.





