पुणे यंदाही पूरस्थितीच्या उंबरठ्यावर!

वेळेत नालेसफाई होण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून अपेक्षाभंग
यंदाही अधिक पावसाचा अंदाज असताना, शहरातील पूरस्थिती रोखण्यासाठी पालिकेने केलेल्या वेळापत्रकाचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे पुणेकरांना यंदाही पुराचा फटका सहन करावा लागण्याची भीती आहे. या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतच असतात. पण, महापालिकेवर आता प्रशासक नियुक्त झाल्यानंतर पावसाळापूर्वीच्या कामांमध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पावसाळा तोंडावर आलेला असतानाच रखडलेली नालेसफाई, रस्त्यांची चुकीच्या पद्धतीने झालेली कामे पाहता, अपेक्षाभंग झाला आहे.
शहरात यापूर्वी केवळ मुठा नदीलाच पूर येत होता. तो ठराविक भागांपुरताच मर्यादित होता. तर शहर टेकड्यांमध्ये वसलेले असल्याने उतारावर आलेले पाणी वाहून नेणारे नाले मोठे होते. मात्र, नागरिकरण वाढत गेले, तसे नाले-वाहिन्या अतिक्रमणांच्या विळख्यात अडकल्या. नाल्याकडेला भराव टाकून जागा गिळंकृत करण्यात आल्या. काही भागात पाइपलाइन टाकून नाले बुजविण्यात आले. तर काही ठिकाणी ते अक्षरश: अनैसर्गिक पद्धतीने वळविण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढत आहे, तसतशी नाल्यांची वहन क्षमता कमी होत आहे. त्याचे परिणाम शहरावर होत असून नदीला पूर न येताही शहराच्या अनेक भागात पावसाचे पाणी शिरत आहे.
अतिक्रमणे, गाळ आणि कचऱ्यामुळे कमी झालेली वहन क्षमता पाहता, पूरस्थिती उद्भवणार हे निश्चित असताना प्रशासनाने पावसाळा सुरू होण्याच्या दोन महिने आधीच हे काम सुरू करणे अपेक्षित आहे. पण, यंदाही हे काम पावसाळ्याच्या तोंडावर अनेक ठिकाणी सुरू आहे. नालेसफाईची कामे अवघी 35 ते 40 टक्केच झाली आहेत. त्यातही, समोर दिसतील असेच नाले स्वच्छ करण्यात आले आहे.नाले सफाईच्या जवळपास 15 ते 20 कोटींच्या निविदा प्रशासनाने वेगवेगळ्या स्तरावर काढलेल्या असल्या, तरी त्या जवळपास 45 टक्के कमी दराच्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या अंदाजापेक्षा 50 ते 55 टक्के कमी खर्चात ही कामे ठेकेदार करू शकतो का? असा प्रश्नही प्रशासनाला पडलेला नाही.
नालेसफाईची “मलई’ खिशात…
पुण्यात दरवर्षी 15 मे नंतर मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात होते. हा पाऊस चांगला पडत असल्याने नाल्यातील गाळ, कचरा वाहून जातो आणि ठेकेदारांना काम न करताही पैसे मिळतात हे वर्षानुवर्षाचे चित्र आहे. असे असतानाही पालिकेने नालेसफाईच्या कामांसाठी 15 जूनची मुदत निश्चित केली आहे. त्यामुळे पाऊस सुरू झाला, की पावसाचे पाणी आपले काम करून जाते आणि ठेकेदारांना काहीच काम करावे लागत नाही. केवळ कागदोपत्री काम दाखवून नालेसफाईची “मलई’ खिशात घातली जाते. अर्धवट कामांमुळे नाल्यांना पूर आलाच, तर “आम्ही काम केले होते पाऊसच जास्त होतो’ असे सांगत वेळ मारून नेली जाते.





